विकासकामांचा आज आळंदीत प्रारंभ
esakal October 26, 2025 06:45 PM

आळंदी, ता. २५ : आळंदीतील प्रस्तावित देहू फाटा येथील भक्तनिवास इमारत बांधकाम भूमिपूजन, संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर महाद्वार ते शनी मंदिर आणि पुंडलिक मंदिर येथील दगडी घाटासाठी पुनर्निर्माण कामाचे भूमिपूजन, ५० रुपये नाममात्र दरामधील ज्ञानेश्वरी ग्रंथाची पारायण प्रत प्रकाशन सोहळा समारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी (ता. २६) सकाळी अकरा वाजता आळंदीमध्ये होणार आहे.
या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मराठी भाषा आणि उद्योगमंत्री उदय सामंत, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, खासदार अमोल कोल्हे, आमदार बाबाजी काळे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्याधिकारी माधव खांडेकर, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजनाथ, विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, चैतन्य महाराज कबीर, डॉ. भावार्थ देखणे, पुरुषोत्तम महाराज पाटील, ॲड. रोहिणी पवार, अक्षय महाराज भोसले, राहुल चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
आळंदी देवस्थानच्या संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जन्मोत्सव कार्यक्रमात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भक्तनिवास बांधकामासाठी २५ कोटी निधीची घोषणा केली होती. त्यातील दहा कोटींचा निधी २८ मे मध्ये नगरपरिषद वैशिष्ट्यपूर्ण बांधकामासाठी विशेष अनुदान म्हणून नगर विकास विभागाकडून मंजूर केला. देहू फाटा येथे भक्तनिवास इमारतीचे बांधकाम केले जाणार असून ते आळंदी देवस्थानला हस्तांतर केले जाणार आहे. शनी मंदिर ते महाद्वार आणि पुंडलिक मंदिर या भागात दगडी घाटाच्या पुनर्निर्माणासाठी पाच कोटींचा निधी मंजूर केला होता. त्याचे भूमिपूजन फ्रुटवाले धर्मशाळेमध्ये होणार आहे.
मराठी भाषेचा गौरव ज्ञानेश्वरी ग्रंथ छपाईसाठी मराठी भाषा विभाग मंत्री उदय सामंत यांनी एक कोटी रुपयांचे अनुदान सरकारकडून उपलब्ध करून दिले. केवळ देणगीमूल्य ५० रुपयांमध्ये ही पारायण प्रत वारकऱ्यांना वितरित केली जाणार आहे. त्याचा प्रकाशन सोहळाही यावेळी होत आहे.
चैतन्य महाराज कबीर म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच उद्योगमंत्री यांनी आळंदी देवस्थानच्या विविध उपक्रमासाठी चालू आर्थिक वर्षात निधी दिला. भक्तनिवास घाटाचे दगडी फरशी बांधकाम, ज्ञानेश्वरी पारायण प्रताबरोबरच वारकरी नागरी रुग्ण तपासणी केंद्र ही आळंदी देवस्थानच्या वतीने भक्तनिवासामध्ये सुरू केले जाणार आहे. या केंद्राचा उद्घाटन समारंभ उद्या उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते केला जाणार आहे.’’

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.