हा अशुभ संकेत..; सतीश शहा यांच्या निधनानंतर अमिताभ बच्चन यांची पोस्ट चर्चेत
Tv9 Marathi October 27, 2025 03:45 PM

दिग्गज अभिनेते सतीश शहा यांच्या निधनाच्या वृत्ताने बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन यांना मोठा धक्का बसला आहे. अत्यंत जवळचे मित्र आणि सहकलाकार सतीश यांना गमावल्यानंतर बिग बींनी अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे. आमच्यासाठी हा एक अशुभ संकेत आहे, असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय. शनिवारी दुपारी 2.30 च्या सुमारास सतीश शहा यांचं निधन झालं. ते मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त होते. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

बिग बींनी ब्लॉगच्या माध्यमातून त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘एक आणखी दिवस, एक आणखी काम, एक आणखी शांती.. आमच्यापैकी आणखी एकाचं निधन झालं. सतीश शहा.. अत्यंत प्रतिभावान कलाकार कमी वयात आम्हाला सोडून गेला. सध्या ग्रहमान आमच्या बाजूने नाहीत. ही अत्यंत गंभीर वेळ आहे. प्रत्येक क्षण आमच्यासाठी अशुभ संकेत आहे. शो चालूच राहिला पाहिजे, या जुन्या म्हणीचं पालन करणं सोपं आहे आणि आयुष्य असंच चालतं. संकट आणि निराशेतही सामान्यता आणि काम करण्याची कला जिवंत राहते. परंतु सामान्यतेचा पाठलाग करणं योग्य नाही’, असं त्यांनी लिहिलंय.

अमिताभ बच्चन यांचा ब्लॉग

सतीश शहा यांचं 25 ऑक्टोबर 2025 रोजी निधन झालं. रविवारी त्यांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. सतीश यांना अखेरचा निरोप देण्यासाठी कलाविश्वातील अनेक कलाकार यावेळी उपस्थित होते. गेल्या काही महिन्यांपासून ते मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त होते. शहा यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

“दुपारी जेवताना हे सर्व घडलं होतं. दुपारी पावणे-दोन, दोन वाजताच्या सुमारास ते जेवायला बसले होते. त्यांनी एक घास खाल्ला आणि अचानक बेशुद्ध झाले. अर्ध्या तासानंतर रुग्णवाहिका आली. जेव्हा आम्ही रुग्णालयात पोहोचलो, तेव्हा त्यांना मृत घोषित करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वीच कोलकातामध्ये त्यांच्यावर किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया झाली होती. डॉक्टरांनी त्यांना दीड महिने पूर्णपणे आराम करण्याचा सल्ला दिला होता. नंतर ते बरे होऊन घरीसुद्धा परतले होते”, अशी माहिती त्यांच्या मॅनेजरने एका वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.