शेअर गुंतवणुकीच्या नावाने गंडा घालणारा गजाआड
esakal October 27, 2025 03:45 PM

शेअर गुंतवणुकीच्या नावाने गंडा घालणारा गजाआड
अंधेरी, ता. २६ (बातमीदार) ः शेअर गुंतवणुकीवर चांगला परतावा देतो, असे सांगून खासगी कंपनीतील अकाउंटटची सहा लाख ६४ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी एका फरार आरोपीस साकीनाका पोलिसांनी अटक केली. ऋषिकेश प्रशांत पोतदार असे या आरोपीचे नाव असून, तो पोलिस कोठडीत आहे.
फसवणुकीसाठी त्याने सायबर ठगांना बँक खाती पुरविल्याचे तपासात उघडकीस आले होते. त्याच्यासह इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आल्याने पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
अनिल शिवमुरत चौबे हे अंधेरीतील साकीनाका परिसरात कुटुंबीयांसोबत राहतात. सध्या ते खासगी कंपनीत अकाउंटंट म्हणून नोकरी करतात. फेसबुकवर १ जूनला चुकून त्यांच्याकडून एक लिंक उघडली गेली. त्यांना अज्ञात व्यक्तीने एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये अॅड केले होते. या ग्रुपमध्ये शेअरसंदर्भातील दैनंदिन माहिती दिली जात होती. ॲडमिन महिलेने शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देताना त्यांच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी वेगवेगळ्या शेअरमध्ये सहा लाख ६४ हजारांची गुंतवणूक केली होती. त्यांना झालेल्या १२ लाखांच्या नफ्याची रक्कम बँक खात्यात पाठवण्यासाठी तिने त्यांच्याकडे काही रक्कम शेअरमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले होते. त्यांनी आणखीन रक्कम गुंतवणूक करण्यास नकार दिला होता. त्यानंतर ग्रुप अॅडमिनसह इतरांनी त्यांना प्रतिसाद देणे बंद केले होते. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी साकीनाका पोलिसांत तक्रार केली होती. तांत्रिक माहितीवरून पोलिसांनी ऋषिकेश पोतदारला ताब्यात घेतले होते. वांद्रे येथील स्थानिक न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.