भाईंदर, ता. २६ (बातमीदार) ः मिरा-भाईंदरमधील नैसर्गिक तलाव छटपूजेसाठी बंद ठेवण्यात आले आहे. सोमवारी (ता. २७) होत असलेली छटपूजा कृत्रिम तलावातच करण्याची भक्तांसाठी परवानगी मिरा-भाईंदर महापालिकेकडून देण्यात आली आहे. जेसल पार्क खाडीसह सात ठिकाणी महापालिकेने कृत्रिम तलावाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
पर्यावरण रक्षणासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यावर्षी सहा फुटांपर्यंतच्या सर्व गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावातच विसर्जन पार पडले. काही ठिकाणी भक्तांकडून कृत्रिम तलावात विसर्जन करण्यास नकार देण्यात आला होता; मात्र प्रशासन आपल्या निर्णयावर ठाम राहिली होती. नवरात्रोत्सवातही देवींच्या मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन पार पडले. आता पाठोपाठ आलेल्या छटपूजेसाठीदेखील नैसर्गिक तलावांचे दरवाजे न उघडण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. छटपूजेसाठी भक्त तलावात छट उभारून त्याची पूजा करतात, तसेच सकाळच्या वेळी पाण्यात उतरून सूर्याला नमस्कार करतात.
दरवर्षी मिरा-भाईंदर शहरातील खाड्या व नैसर्गिक तलावात हा उत्सव पार पडत असतो; मात्र यावर्षी छटपूजेसाठीदेखील नैसर्गिक तलाव उपलब्ध करून देऊ नये, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली होती. त्यानंतर महापालिकेने नुकताच यासंदर्भात निर्णय जाहीर केला आहे. या कृत्रिम तलावातच छ्टपूजेचा उत्सव पार पडणार आहे. या उत्सवासाठी महापालिकेकडून कपडे बदलण्यासाठी कक्ष, तात्पुरती स्वच्छतागृहे, वैद्यकीय पथक व अग्निशमन दल आदी सुविधा तैनात करण्यात आली आहेत, अशी माहिती महापालिकेचे शहर अभियंता दीपक खांबित यांनी दिली.
या ठिकाणी सुविधा...
भाईंदर पूर्व येथील जेसल पार्क चौपाटी येथील खाडी, त्याचप्रमाणे नवघर तलाव, काशी गाव येथील जरीमरी तलाव, मिरा गावातील सातकरी तलाव, पेणकर पाडा येथील साईदत्त तलाव, मिरा रोड येथील शिवार गार्डन, सेव्हन इलेव्हन शाळेमागील मैदान येथे महापालिकेकडून कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत.