Pune Crime : 'अल कायदा'शी संपर्कात असलेल्या तरुणास अटक
esakal October 28, 2025 03:45 AM

पुणे - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अल कायदा दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेल्या एका तरुणास अटक केली. हा तरुण संगणक अभियंता असून कोंढवा येथील रहिवासी आहे. सोमवारी (ता. २६) पुणे रेल्वे स्थानकावर ही कारवाई करण्यात आली.

झुबेर हंगर्जीकर (वय-३२, रा.कोंढवा) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्या साथीदारास चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिली. झुबेरचा अल कायदा संघटनेशी संपर्क असल्याचे तसेच त्याच्याकडे काही आक्षेपार्ह साहित्यही (पुस्तके) सापडली आहेत.

एटीएसने नऊ ऑक्टोबरला कोंढवा, वानवडी, खडकी आणि इतर परिसरात मोठ्या प्रमाणात छापेमारी करून १८ जणांना तपासासाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून १९ लॅपटॉप, मोबाईल आणि काही साहित्य जप्त करण्यात आले होते. यातील एका लॅपटॉपमधील माहितीवरून तरुणास अटक करण्यात आली आहे.

पुणे पोलिसांनी यापूर्वी वाहन चोरीच्या संशयावरून कोथरूडमध्ये तिघांना पकडले होते, मात्र तपासात हे तिघे दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर देशातील तपास यंत्रणांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू करण्यात आला. या गटातील एक दहशतवादी अटक झाल्यानंतर त्याच्या चौकशीतून ते आयसीस संघटनेशी जोडलेले असल्याचे उघड झाले.

त्यांनी मुंबई, पुणे, गुजरात आणि देशातील काही प्रमुख शहरांमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट रचल्याचेही समोर आले होते. तसेच, या आरोपींनी कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांतील जंगलात बॉम्बस्फोटांची चाचणी घेतल्याची धक्कादायक माहिती तपासात उघडकीस आली होती.

त्यांच्या ताब्यातून पुण्यातील काही महत्त्वाच्या ठिकाणांचे फोटो आणि व्हिडिओ देखील पोलिसांना मिळाले होते. त्यांनी चोरीच्या दुचाकीवरून एका व्यापाऱ्याला लुटून त्या पैशांचा वापर दहशतवादी कारवायांसाठी केल्याचेही निष्पन्न झाले होते.

हंगर्जीकरला चार नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी -

हंगर्जीकर याला सोमवारी (ता. २७) न्यायालयात हजर करण्यात आले होते. झुबेरचा अल कायदा संघटनेशी संपर्क असल्याचे तसेच त्याच्याकडे काही आक्षेपार्ह साहित्यही (पुस्तके) सापडली आहेत. ते अल कायदा संघटनेशी कसा संपर्कात आला.

त्याने काही देश विघातक कारवाया केल्या आहेत का? त्याचे कोण साथीदार आहेत, याचा तपास करायचा आहे. त्यामुळे त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील विलास पठारे यांनी केला. त्यानुसार न्यायालयाने हंगर्जीकरला चार नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.