Pune News : पुणे महापालिकेची प्रभाग रचना आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला
esakal October 28, 2025 03:45 AM

पुणे - पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेचे आरक्षण कधी पडणार? याकडे राजकीय कार्यकर्ते, इच्छुक उमेदवारांचे डोळे लागले होते. अखेर राज्य निवडणूक आयोगाने या तारखा जाहीर केल्या आहेत. ११ नोव्हेंबर रोजी प्रारूप आरक्षण सोडत जाहीर होणार आहे.

या आरक्षणावर २४ नोव्हेंबरपर्यंत नागरिकांना हरकती आणि सूचना नोंदविल्यानंतर २ डिसेंबरला अंतिम आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. ही आरक्षणे जाहीर झाल्यानंतर कोण कोणत्या प्रभागातून लढणार, कोणाचा पत्ता कट झाला हे स्पष्ट होणार आहे.

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी ४१ प्रभागांमधून १६५ नगरसेवकांची निवड केली जाणार आहे. यामध्ये ५० टक्के जागा या महिला उमेदवारांसाठी राखीव असणार आहेत. तसेच अनुसूचित जातीसाठी १३ टक्के, अनुसूचित जमातीसाठी ७ टक्के, इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी (ओबीसी) २७ टक्के आणि असतात.

एकूण जागांपैकी ५० टक्के म्हणजेच ८३ जागा महिलांसाठी राखीव असतील. अनुसूचित जातींसाठी २२, अनुसूचित जमातींसाठी २, आणि ओबीसी प्रवर्गासाठी ४४ जागा राखीव असणार आहेत.

आरक्षित प्रभाग निश्चित करण्यासाठी निवडणूक आयोगाने आज वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यात ११ नोव्हेंबररोजी सोडत काढली जाणार असल्याचे जाहीर केले आहे.

असे आहे आरक्षण सोडतीचे वेळापत्रक

- आरक्षित जागांची संख्या निश्चित करून निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव सादर करणे - ३० ऑक्टोबर -४ नोव्हेंबर

- आरक्षण सोडतीची जाहीर सूचना प्रसिद्ध करणे - ८ नोव्हेंबर

- आरक्षणाची सोडत काढून निकाल राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करणे - ११ नोव्हेंबर

- प्रारूप आरक्षणावर हरकती व सूचना नोंदविण्याची अंतिम तारीख - २४ नोव्हेंबर

- हरकती व सूचनांवर विचार करून निर्णय घेणे - २५ नोव्हेंबर - १ डिसेंबर

- आयोगाच्या मान्यतेनंतर अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे - २ डिसेंबर

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.