पिंपळवंडी, ता.२७ : येथील काकडपट्टा (ता.जुन्नर) शिवारातील शेतकरी मयूर नेताजी वाघ यांच्या घराजवळ लावलेल्या पिंजऱ्यात सोमवारी (ता.२७) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला.
वाघ यांनी सांगितले की, सकाळी साडेसहाच्या दरम्यान दोन बिबटे हे पिंजऱ्याच्या जवळ आल्याचे आम्हाला दिसले. त्यातील एक बिबट्या जेरबंद झाला. घटनेची माहिती वनविभागाला कळविल्यानंतर वनपाल अनिल सोनवणे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बिबट्यास माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात नेले. सदर बिबट दोन वर्षे वयाची मादी असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, वाघ यांच्या घराजवळ काही दिवसांपूर्वी बिबट्याने एक मेंढरू ठार केले होते. त्या बिबट्यानेच वाघ यांच्या घराच्या दरवाजाला धडका देखील दिल्या होत्या. तसेच त्यानंतर याच परिसरात एका मेंढपाळावर बिबट्याने हल्ला देखील केला होता.
पिंपळवंडी परिसरात वनविभागाच्या माध्यमातून येथे पिंजरे लावले होते परंतु अनेक प्रयत्न करून देखील यात बिबट्या जेरबंद होत नव्हता. अखेर सोमवारी बिबट्या जेरबंद झाला. असे असले तरी या परिसरात अजून बिबटे असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
02657