पिंपरी, ता. २७ : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महर्षी वाल्मीकी जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात महापुरुषांचा अवमान झाला. तसेच कार्यक्रमात उपस्थित असलेल्या नागरिकांची व्यवस्था करण्यात आली नाही, अशी तक्रार ॲड. सागर चरण यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे केला. आयोगाने या प्रकरणाची दखल घेत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना चौकशीचा अहवाल १५ दिवसांत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
ॲड. सागर चरण यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, ‘महापालिकेच्या अधिकृत कार्यक्रमात महर्षी वाल्मीकी यांची प्रतिमा असलेले पोस्टर फाटलेले होते. तसेच त्यांची प्रतिमा योग्य ठिकाणी, सावलीत सन्मानाने ठेवण्यात आली नव्हती. याशिवाय, कार्यक्रमात उपस्थित अनेक महिला सफाई कामगारांसाठी बसण्यासाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यांना उन्हात आणि जमिनीवर बसवण्यात आले.’ आयोगाने तक्रारीनंतर आयुक्तांना पत्र पाठवून घटनेची सखोल चौकशी करण्याचे आणि दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध योग्य कारवाई करून १५ दिवसांच्या आत आयोगाकडे अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
-----