रावेत, ता. २७ : औंध-रावेत बीआरटी रस्त्यावर मुकाई चौक पीएमपीएमएल बसस्थानकासमोर अनधिकृत ‘यू-टर्न’ घेतला जात आहे. यामुळे दररोज सकाळ-सायंकाळी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. किवळे गाव, विकासनगर आणि रावेत येथून औंधच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांकडून नियमबाह्य पद्धतीने याच ठिकाणी ‘यू-टर्न’ घेतला जात आहे. यामुळे वाहतूक व्यवस्थेचा खोळंबा होत आहे.
दररोज सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांची आणि शाळा, कॉलेजच्या बसची वर्दळ असते. या वेळी ‘यू-टर्न’मुळे वाहनांची रांग लागते. बीआरटी मार्गावरून थेट ‘यू-टर्न’ घेणे नियमविरोधी असूनही दुचाकी, चारचाकी तसेच छोटी मालवाहतूक वाहने सहजपणे हा वळताना दिसतात. यामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना धोक्याचा सामना करावा लागतो.
‘‘महापालिका व वाहतूक विभागाकडे या ठिकाणी कायमस्वरुपी बॅरिकेड्स लावण्याची आणि पोलिस नियुक्त करण्याची मागणी केली आहे. या रस्त्यावर स्पष्ट दिशादर्शक फलक आणि ‘नो यू-टर्न’चे फलक लावावेत,’’ अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, देहुगाव वाहतूक विभागातील एका कनिष्ठ अधिकाऱ्याने नाव प्रकाशित करण्याच्या अटीवर सांगितले, की ‘‘या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याची नोंद घेतली आहे. लवकरच तेथे बीआरटी लेनचे बॅरिकेड्स पुन्हा बसवले जातील.’’
मुकाई चौक हा आधीच गर्दीचा भाग आहे. येथे वाहतूक पोलिस नसल्याने प्रत्येकजण आपल्या सोयीने वळण घेतो. परिणामी, दररोज वाहतूक कोंडी होते आणि वाहनांची रांग बीआरटी मार्गापर्यंत पोहोचते.
- स्नेहल पवार, वाहनचालक
बीआरटी मार्गावर नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होत नाही. त्यामुळे सर्वव वाहनचालक धोकादायकपणे वळण घेत आहेत. काही वेळा दोन वाहनांमध्ये अपघाताचे प्रसंग ओढवले.
- राहुल जगताप, वाहनचालक