खेड तालुक्यात विंधन विहिरी गाळात
टंचाईचे संकट गडद ; ४१ प्रस्ताव धूळखात
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २७ : तालुक्यात पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस तीव्र होत असून, प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तालुक्यातील तब्बल ९७ विंधन विहिरी गाळात रुतल्या आहेत तर ४१ विंधन विहिरींचे दुरुस्ती प्रस्ताव मंजुरीअभावी धूळखात पडलेले असल्याचे समोर आले आहे.
पाणीटंचाईवर नियंत्रण आणण्यासाठी विंधन विहिरी हे अत्यंत किफायतशीर आणि प्रभावी साधन ठरते; मात्र, या विहिरींचा गाळ उपसा न झाल्याने त्या निष्क्रिय झाल्या असून, गावकऱ्यांना तहानलेले दिवस अनुभवावे लागत आहेत. नैसर्गिक जलस्रोत असूनही प्रशासनाने या विहिरींकडे डोळेझाक केली आहे. दरवर्षी पाणीटंचाई आराखड्यात गाळ उपसा, विहिरी दुरुस्ती, पूरक नळपाणी योजना, खासगी विहिरी अधिग्रहण यांचा समावेश केला जातो; मात्र, प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये रोष आहे. पाणीटंचाईवर उपाय म्हणून तयार करण्यात आलेल्या २१ विहिरी दुरुस्तीचे आणि एकूण ४१ विहिरींच्या मंजुरीसाठीचे प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठवले गेले होते; मात्र, या प्रस्तावांकडे दुर्लक्ष झाल्याने ते धूळखात पडले आहेत.
जलजीवन मिशन योजनेमुळे काही प्रमाणात टंचाईग्रस्त गावांची संख्या कमी झाली असली, तरी गाळाने भरलेल्या विहिरींमुळे अनेक वाड्या अजूनही तहानल्या आहेत. प्रशासनाने तसदी न घेतल्याने आगामी उन्हाळ्यात टंचाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे ठाम मागणी केली आहे की, गाळ काढणे आणि नादुरुस्त विहिरींची दुरुस्ती या संदर्भातील कामे युद्धपातळीवर सुरू करावीत अन्यथा तालुक्यात पुन्हा पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
-----
कोट
विहिरीतील गाळ उपसा आणि दुरुस्तीचे काम प्रशासनाने तातडीने हाती घेतले तर तालुक्यातील पाणीटंचाईचे सावट दूर होईल.
- उदय बोरकर, माजी सरपंच, बोरघर