'पैशासाठीच प्रमोद महाजनांची हत्या? प्रवीण महाजन भावाला करत होते ब्लॅकमेल'; प्रकाश महाजनांच्या दाव्यावर काय म्हणाल्या सारंगी महाजन?
esakal October 28, 2025 11:45 AM

Pramod Mahajan Case : प्रकाश महाजन यांनी दिवंगत भाजपा नेते प्रमोद महाजन यांच्या हत्येबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, प्रवीण महाजन हे आपल्या मोठ्या भावाला, म्हणजेच प्रमोद महाजन यांना फक्त पैशांसाठी ब्लॅकमेल करत होते. या ब्लॅकमेलिंगमध्ये एका तिसऱ्या व्यक्तीचा सहभाग होता, जी आजही जिवंत आहे, त्यामुळे तिचं नाव उघड करणार नाही, असा प्रकाश महाजन यांनी दावा केला.

त्यांच्या मते, प्रमोद महाजन यांची हत्या पैशाच्या हव्यासातून आणि मत्सरातूनच झाली. काही काळापूर्वी सारंगी महाजन यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या वारसावरून पंकजा मुंडे यांच्यावर टीका करत “बिघडलेली मुलगी” असा उल्लेख केला होता आणि धनंजय मुंडे यांनाही लक्ष्य केलं होतं.

Bihar Election : बिहार निवडणुकीच्या प्रचारातून राहुल गांधी गायब! काँग्रेसची वेगळी रणनीती चर्चेत, भाजप संधीचा घेणार फायदा?

आता प्रकाश महाजन यांच्या वक्तव्यावर सारंगी महाजन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्या म्हणाल्या, “गोपीनाथ मुंडे यांच्या बदनामीचा प्रश्नच उद्भवत नाही. कोर्ट केस हा एक वेगळा मुद्दा आहे आणि वारसा हक्काचा विषय पूर्णपणे वेगळा आहे. या दोन्ही गोष्टींचा काहीही संबंध नाही. मुंडे-महाजन कुटुंबाशी पूर्वीपासूनच कोणतेही संबंध नव्हते आणि आजही नाहीत.”

प्रवीण महाजन यांनी प्रमोद महाजन यांना पैशांसाठी ब्लॅकमेल केल्याच्या दाव्यावर त्या म्हणाल्या, “ब्लॅकमेलिंगचा प्रश्नच येत नाही. पैशांसाठी काहीच केलं नाही. प्रकाश महाजन औरंगाबादमध्ये राहतात; त्यांना याची प्रत्यक्ष माहिती नाही. ते जे बोलले आहेत ते त्यांचे शब्द नाहीत, त्यांना कोणी तरी सांगितलेलं आहे. माझ्या मते, ही माहिती त्यांना मुंडे कुटुंबातूनच पुरवली गेली आहे.”

त्यांनी पुढे स्पष्ट केलं, “प्रवीण आणि प्रमोद यांच्यात प्रचंड प्रेम होतं. ते एकमेकांकडे काही मागत आणि देतही होते. कारण, ते भावंडं होती. त्यामुळे ब्लॅकमेलिंगचा प्रश्नच नाही.”

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.