आज मुंबईमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते भाजपच्या कार्यालयाचं भूमिपूजन झालं, यावेळी बोलताना त्यांनी मोठं विधान केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात 2014 च्या निवडणुकीची आठवण करून दिली, आम्ही 2014 ला युतीचा प्रयत्न केला पण स्वातंत्र्य लढलो आणि महाराष्ट्राला पहिला भाजपचा मुख्यमंत्री मिळाला, त्यानंतर तीनवेळा आम्हाला बहुमत मिळालं असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. यावर प्रतिक्रिया देताना आता आम्हाला डबल इंजिन सरकार नको आहे, ट्रिपल इंजिन सरकार हवे आहे , असं अमित शाह यांनी म्हटलं.
नेमकं काय म्हणाले अमित शाह?
छत्रपती शिवाजी महाराज व पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या स्मृतींना अभिवादन करून बोलतो
सर्व भाजप कार्यकर्त्यांसाठी आज शुभ दिवस आहे. महाराष्ट्र भाजप आपल्या नव्या कार्यालयाचे भूमिपूजन करून इतिहासात एक नवीन सुरुवात करतोय, पक्षाची स्थापना झाल्यापासून छोट्या, मोठ्या कार्यकर्त्यांपासून मोठ्या नेत्यांना देखील माहिती आहे, की कार्यालय हे आपले मंदिर आहे. पक्षाचे सिद्धांतांचं संवर्धन हे कार्यालयातच होतं. कार्यालयात कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण होते. बाकीच्या पक्षांसाठी कार्यालय हे फक्त काम करण्याचे ऑफिस असेल, भाजपासाठी कार्यालय म्हणजे मंदिर आहे असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, आम्ही नेहमीच सिद्धांताच्या आधारे निती घडवली आहे. भारत व भारतीय लोकांच्या हितासाठी कठोर संघर्ष केला आहे. मी देवेंद्र फडणवीस आणि सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो. आज भाजपची वाटचाल कुठल्याही कुबड्यांचा आधार न घेता सुरू आहे. स्वत:च्या बळावर भाजप उभी आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर भाजप हे एक मजबूत स्वाक्षरी म्हणून दिसत आहे.
इमारत पाहून मी अभिनंदन करतो, ५५ हजार चौरस फुटाचे हे कार्यालय आहे. लायब्ररी, कॉन्फरन्स रूम, प्रदेशाध्यक्ष सोबत मुख्यमंत्र्यांचे कार्यालय आहे. हे कार्यालय मुख्यमंत्र्यांना आठवण करून देईल की येथूनच निवडून जायचे आहे. मला आनंद आहे, महाराष्ट्र भाजप प्रदेशने आपल्या परंपरेस लक्षात ठेवले आहे, जनसंघानंतर भाजप निर्माण झाले, तेव्हा अटलजी बोलले होते, कमळ खिलेगा. तेव्हा आपण पाहिले अटलजी पंतप्रधान झाले. त्यानंतर ११ वर्षे मोदीजी पंतप्रधान आहेत. देशाचे पंतप्रधान हे भाजपचे नेता झाले हे आपल्यासाठी गौरवाची बाब आहे, असं यावेळी अमित शाह यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात 2014 च्या निवडणुकीची आठवण करून दिली, आम्ही 2014 ला युतीचा प्रयत्न केला पण स्वातंत्र्य लढलो आणि महाराष्ट्राला पहिला भाजपचा मुख्यमंत्री मिळाला, त्यानंतर आम्हाला तिनदा बहुमत मिळालं असं फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यावर बोलताना अमित शाह यांनी म्हटलं की, डबल इंजिन सरकार नको आहे. ट्रिपल इंजिन सरकार हवे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी असे लढावे की विरोधकांचा सुपडा साफ झाला पाहिजे, असं यावेळी अमित शाह यांनी म्हटलं आहे.