'वस्त्रहरण'कार गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड; मालवणी भाषेचा दूर हरपला!
Tv9 Marathi October 28, 2025 02:45 PM

‘वस्त्रहरण’ या लोकप्रिय नाटकाचे लेखक गंगाराम गवाणकर यांचं सोमवारी वृद्धापकाळाने निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. मुंबईतील दहिसर इथल्या खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर आज (मंगळवार) दहिसर इथल्या अंबावाडी, दौलतनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. गंगाराम यांचं पार्थिव आज सकाळी 9.30 वाजता बोरिवली इथल्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात मुलं आणि नातवंडं असा परिवार आहे.

‘वस्त्रहरण’ या नाटकाने गंगाराम गवाणकर यांना मराठी नाट्यसृष्टीच्या इतिहासात अजरामर केलं. या नाटकाने केवळ प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू आणले नाहीत, तर मालवणी बोलीभाषेच्या अस्सल भावविश्वाला मुख्य प्रवाहात आणलं. पहिल्यांदाच मालवणी भाषेतील नाटक मुख्य व्यावसायिक नाटकांच्या प्रवाहात आणून लोकप्रिय करण्याचं श्रेय गवाणकर यांना जातं. ‘वस्त्रहरण’ हे नाटक आजही तितकंच लोकप्रिय आहे.

मालवणी बोलीभाषेतील ‘वस्त्रहरण’ या नाटकाचे पाच हजारांहून अधिक प्रयोग झाले. तर ‘वात्रट मेले’ या त्यांच्या नाटकाचेही दोन हजारांहून अधिक प्रयोग झाले होते. गंगाराम गवाणकर यांनी ऐन उमेदीच्या काळात खडतर संघर्ष अनुभवला होता. घराचा गाडा चालवण्यासाठी त्यांनी एमटीएनएलमध्ये नोकरीसुद्धा केली. नोकरी करता करता त्यांनी नाट्यलेखनाची आवड जोपासली. 1971 मध्ये त्यांनी रंगभूमीवरील कारकिर्दीला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी बॅकस्टेजवर काम केलं. त्यानंतर हळूहळू ते नाट्यलेखक म्हणून नावारुपाला आले.

‘वरपरीक्षा’, ‘दोघी’, ‘वर भेटू नका’, ‘वेडी माणसे’ यांसारखी नाटके त्यांनी लिहिली आहेत. ‘दोघी’ हे नाटक त्यांनी काळाच्या पुढचा विचार करून लिहिलं होतं. तर विनोदी शैलीत फटकारणारं नाट्यलेखन ही त्यांची खासियत होती. ‘वन रुम किचन’ हेसुद्धा त्यांच्या नेहमीच्या शैलीपेक्षा वेगळं नाटक होतं. परंतु ‘वस्त्रहरण’ ही त्यांची अखेरपर्यंतची ओळख ठरली. हे नाटक लिहिण्याचा अनुभव, त्या निमित्ताने आलेल्या आठवणी आणि आपल्या आयुष्याची वाटचाल या सर्वांची मांडणी त्यांनी ‘व्हाया वस्त्रहरण’ या पुस्तकात केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.