निलेश घायवळच्या लंडनमध्येच मुसक्या आवळणार; पुणे पोलिसांचं UK च्या हाय कमिशनला पत्र
Marathi October 28, 2025 06:25 PM

पुणे: पुण्यातील कोथरूड परिसरातील गुंड निलेश घायवळच्या (Nilesh Ghaywal) अडचणी आणखी वाढणार आहेत. यूकेला पुणे पोलिसांनी पत्र लिहून निलेश घायवळला (Nilesh Ghaywal) तात्काळ ताब्यात घ्या, असं म्हटलं आहे. पुणे पोलिसांनी युनायटेड किंगडमच्या हाय कमिशनला पत्र लिहून निलेश घायवळचा शोध घेऊन ताब्यात घेण्याची मागणी केली आहे. घायवळने (Nilesh Ghaywal) चुकीच्या प्रक्रियेतून पासपोर्ट मिळवल्याचा गंभीर आरोप पोलिसांनी केला आहे. त्याच्यावर पुण्यात अनेक गुन्हे दाखल असल्याचा उल्लेखही पत्रात करण्यात आला आहे. घायवळ (Nilesh Ghaywal) कुठे आहे हे शोधून तात्काळ माहिती द्यावी, अशी विनंती यूके हाय कमिशनकडे करण्यात आली आहे. या प्रकरणात दोन्ही देशांमध्ये पत्रव्यवहार सुरू असून पुढील कारवाईला वेग येण्याची शक्यता आहे.(Nilesh Ghaywal)

Nilesh Ghaywal: गॅंगस्टर निलेश घायवाळचा पासपोर्ट रद्द

गुंड निलेश घायवळचा पासपोर्ट बनावट कागदपत्रांवर बनवला गेल्याचे उघड झाल्यानंतर पुणे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने (RPO) त्याचा पासपोर्ट रद्द केला आहे. गुरुवारी ही कारवाई करण्यात आली. घायवळने अर्जामध्ये खोटा पत्ता आणि बदललेले आडनाव नमूद केले होते, अशी माहिती पोलीस उप आयुक्त (झोन ३) संभाजी कदम यांनी दिली. तपासात ‘अहिल्यानगर’ हा नमूद केलेला पत्ता अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

निलेश घायवळ आणि त्याच्या साथीदारांनी १७ ते १८ सप्टेंबरच्या दरम्यान कोथरुड पोलीस स्टेशनजवळ एका व्यक्तीवर गोळीबार केला होता. त्यानंतर त्यांनी काही अंतरावर एकावरती धारदार शस्त्राने मारहाण केल्याचीही घटना घडली. या दोन घटनांप्रकरणी घायवळ आणि त्याच्या टोळीविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपासात पोलिसांनी घायवळ, त्याचा भाऊ आणि इतर साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (MCOCA) गुन्हा नोंदवून कारवाई केली असून, आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

Nilesh Ghaywal: पासपोर्ट पोलिसांकडे जमा करण्याचे आदेश

पुण्यातील कोथरूड परिसरातील गोळीबार प्रकरणात घायवळसह साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली. पण, घायवळ ११ सप्टेंबरपासून परदेशात असल्याची माहिती मिळाली आहे, यापूर्वी घायवळविरुद्ध ‘मकोका’ कारवाई करण्यात आली होती. त्या वेळी न्यायालयाने त्याला काही अटी आणि, शर्तींवर जामीन मंजूर केला होता. त्या वेळी घायवळला पासपोर्ट पोलिसांकडे जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.

Nilesh Ghaywal: अहिल्यानगरमधील पत्त्याचा वापरून पासपोर्ट काढला

‘घायवळने परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट कसा मिळवला, याचा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. पासपोर्ट काढताना त्याने ‘घायवळ’ ऐवजी ‘गायवळ’ असे नाव असलेली कागदपत्रे सादर केली. त्याने अहिल्यानगरमधील पत्त्याचा वापरून पासपोर्ट काढला, पुणे पोलिसांनी तेथे त्याने दिलेल्या त्या आहिल्यानगरच्या पत्त्यावर छापा टाकला. मात्र, पासपोर्ट मिळविण्यासाठी दिलेला पत्ता खोटा असल्याचे उघडकीस आले, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

Nilesh Ghaywal:  प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचं समोर

घायवळने पासपोर्टसाठी अर्ज करताना प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्या प्रतिज्ञापत्रात त्याने स्वतःविरुद्ध राज्यात किंवा इतर कोणत्याही परराज्यात कोणताही गुन्हा नोंदलेला नाही, असा दावा केला होता.

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.