वर्दी नसताना वाहनं अडवली, PSI बदनेचा नवा कारनामा; व्हिडीओ व्हायरल झाल्यानं अडचणी वाढणार
esakal October 28, 2025 08:45 PM

फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेल्या पीएसआय गोपाळ बदने याचा एक जुना व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. महिला डॉक्टरने आत्महत्येआधी हातावर लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये पीएसआय गोपाळ बदने आणि घरमालकाचा मुलगा प्रशांत बनकर या दोघांची नावे होते. पीएसआय गोपाळ बदने हा स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. आता त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

वर्दीवर नसतानाही पीएसआय गोपाळ बदने हा रस्त्यावर गाड्या अडवून चालकांची चौकशी करत होता. तेव्हा एका वाहनचालकानं मोबाईलवर त्याचं शूटिंग केलं. आत्महत्या प्रकरणात गोपाल बदने चर्चेत आल्यानंतर त्याचा हा जुना व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.

पीडितेचे आरोपी बनकरशी संबंध, महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी दिली वेगळीच माहिती;आत्महत्येचं कारण...

गोपाळ बदने हा सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, त्याच्या नव्या व्हिडीओनं खळबळ उडाली आहे. पोलीस आता या व्हिडीओनंतर काय कारवाई करणार याकडे लक्ष लागलं आहे. व्हिडीओ कधीचा, कुठला आहे याची माहिती समोर आलेली नाही. पीएसआय बदने हा तेव्हा नशेत होता असंही म्हटलं जात आहे.

पीएसआयवर अत्याचाराच्या आरोपाची पडताळणी

महिला डॉ़क्टरने पीएसआय बदने यानं चारवेळा बलात्कार केल्याचं सुसाइड नोटमध्ये म्हटलंय. त्याबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या की, पीएसआय बदने याच्यावर बलात्काराचा आरोप आहे. आता त्या दोघांचे लोकेशन कुठं एकत्र होते का? पीएसआय बदनेंचे पोलिसात रेकॉर्ड आहेत त्यावरून पडताळणी केली जाईल. सीडीआर रिपोर्टमधूनही माहिती समोर येईल. तिघांशिवाय आणखी कुणाचे सीडीआर काढायचे असल्यास तेही काढण्यात येतील.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.