Solapur News: जुळे सोलापुरातील नाट्यगृहाची मागणी २० वर्षांपासून प्रलंबितच; रसिकांची गैरसोय; महापालिकेकडून टाकली जाताहेत केवळ आरक्षणे
esakal October 28, 2025 08:45 PM

सोलापूर: जुळे सोलापुरात नाट्यगृहाची उभारणी व्हावी, या साहित्य व सांस्कृतिक कलाकार अन् रसिकांच्या मागणीला तब्बल २० वर्षे पूर्ण झाली आहेत. तरी नाट्यगृहासाठी जागा मिळालेली नाही. जुळे सोलापूर दुप्पटीपेक्षा अधिक विस्तारले. शैक्षणिक अन्य सर्व विभागात मोठी वाढ झाली आहे. तरीही लोकप्रतिनिधी आणि प्रशासन दोन्ही स्तरावरून मागणीकडे दुर्लक्षच आहे.

Kaikadi Community: कैकाडी समाजाचा करावा अनुसूचित जमातीत समावेश; निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

जुळे सोलापुरात २० वर्षांपूर्वी नवे नाट्यगृह उभारले जावे, अशी मागणी केली गेली होती. त्यासाठी मागणीचा एक ठराव देखील त्यावेळी झालेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनावेळी करण्यात आला होता. त्यावेळी जुळे सोलापूरचा विस्तार फारसा झालेला नव्हता. नंतर विजापूर व होटगी रोडच्या दोन्ही बाजूंनी शहराचा विस्तार झाला. नाट्यगृह व्हावे, यासाठी अनेक वेळा प्रयत्न झाले. महानगरपालिकेचे आरक्षण देखील झाली. पण प्रत्यक्षात जागेचा शोध कागदावरच राहिला.

ए. डी. जोशी महाविद्यालयाच्या परिसरात जागा शोधली गेली. भारती विद्यापीठाजवळ गो. मा. पवार यांच्या घराजवळील वनविभागाच्या जागेत नाट्यगृह उभारावे असे ठरले, नंतर इंचगिरी मठाजवळ वनखात्याच्या जागेचा विचार झाला. याठिकाणी नाट्यगृह व जुळे सोलापूर बसस्थानक या दोन्हीची उभारणी भव्य पार्कींगसह होऊ शकेल असे सांगितले. त्यानंतर डी-मार्ट जवळील महानगरपालिकेच्या पाण्याच्या टाक्याच्या परिसरातील जागा घ्यावी असे सुचविण्यात आले. एवढ्या जागांची चर्चा होऊन नाट्यगृहाचा विषय पुढे सरकला नाही. सुरवातीला नाट्यगृहाची क्षमता तत्कालीन स्थितीमुळे कमी असावी अशी भूमिका होती. त्यानंतर वाढत्या लोकसंख्येचा विचार करून एक हजार आसन क्षमतेचे नाट्यगृह उभारणे गरजेचे झाले आहे. एवढ्या जागांचा शोध करूनही महानगरपालिका व कर्त्याधर्त्या राजकीय मंडळींना जुळे सोलापूरकरांची मागणी पूर्ण करता आली नाही हे विशेष.

महापालिकेचे दोन वेळा जागा आरक्षित

जुळे सोलापुरातील टाकळीकर मंगल कार्यालय, भंडारी मैदानाच्या परिसरात आरक्षणही टाकण्यात आले होते. मात्र नंतर ते उठविण्यात आले. आता नव्या विकास आराखड्यात नेहरूनगर जवळ नाट्यगृहाचे गट क्र. ४० येथे नाट्यगृहासाठी आरक्षण टाकण्यात आले आहे. याआधीही आरक्षण टाकले आताही आरक्षण असले तरी प्रत्यक्षात नाट्यगृह कधी होणार असा सवाल आहे.

महानगरपालिकेला ६० टक्के कर महसूल जुळे सोलापुरातून मिळतो. अनेक वर्षांपासून ही नाट्यगृहाची मागणी आहे. पण त्याला कोणी दाद देईनासे झाले आहे. सर्व लोकप्रतिनिधींनी आश्वासने दिली. पण त्याचे काहीच झाले नाही.

- विजयकुमार शाबादी, संस्थापक, विजापूर मध्यवर्ती, सोलापूर

पाच हजार स्क्वे.फूट जागेत उत्तम १ हजार आसन क्षमतेचे नाट्यगृह व्हावे ही अपेक्षा आहे. २० वर्षांपासून आजही जुळे सोलापूरकर रसिकांची मागणी प्रत्यक्षात आली नाही.

- पद्माकर कुलकर्णी, अध्यक्ष, मसाप जुळे सोलापूर शाखा

Solapur Jain community: खरेदीखत रद्द करा, जैन बोर्डिंगची जागा समाजाच्या ताब्यात द्या; सोलापुरातील जैन संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

या भागातील रसिकांना गावात जाऊन सांस्कृतिक कार्यक्रमास जाणे गैरसोयीचे ठरते. त्यामुळे इच्छा असूनही चांगल्या कार्यक्रमास जाता येत नाही. जुळे सोलापूरकरांसाठी ही गैरसोय अत्यंत त्रासदायक आहे.

- डॉ. माधवी रायते, सल्लागार, मसाप जुळे सोलापूर शाखा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.