ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे मालिका संपल्यानंतर आता दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी तयारी सुरु झाली आहे. पुढच्या महिन्यात म्हणजेच 30 नोव्हेंबरला दक्षिण अफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू होणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध निवडलेला संघच या मालिकेत खेळेल. त्यात फार काही बदल होईल असं वाटत नाही. पण श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त असल्याने त्याची जागा भरून काढणं गरजेचं आहे. कारण श्रेयस अय्यर अजून एक महिना तरी रिकव्हर होणं कठीण आहे. त्यामुळे त्याच्या जागी कोणत्या खेळाडूची निवड करायची हा पेच असणार आहे. या यादीत तीन खेळाडू असून त्यापैकी एकाची निवड होऊ शकते.
संजू सॅमसन : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत संजू सॅमसन याची निवड होईल असं बोललं जात होतं. सलामीला फलंदाजी करेल वगैरे चर्चा रंगली होती. पण त्याला संघात काही स्थान मिळालं नाही. आता चौथं स्थान रिक्त असल्याने त्याची दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत निवड होऊ शकते. मागच्या वनडे मालिकेत त्याने चांगली कामगिरी केली होती. सॅमसनने 16 वनडे सामन्यात 56.66 च्या सरासरीने 510 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर एक शतक आणि तीन अर्धशतकं आहेत. श्रेयस अय्यरची जागा घेऊ शकतो.
तिलक वर्मा : श्रेयस अय्यरसाठी तिलक वर्मा हा चांगला पर्याय ठरू शकतो. कारण आशिया कप स्पर्धेत त्याने सावध पण विजयी खेळी केली होती. त्याच्या खेळीमुळे टीम इंडियाला जेतेपद मिळवता आलं होतं. 2023 मध्ये त्याने बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतून वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्याने चार सामन्यात 68 धावा केल्या आहेत. सध्या फॉर्मात असून आत्मविश्वासही चांगला आहे.
रियान पराग : श्रेयस अय्यरच्या जागी अष्टपैलू रियान पराग हा तिसरा पर्याय ठरू शकतो. रियान परागने श्रीलंकेविरुद्ध वनडे सामन्यात पदार्पण केलं होतं. पण दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडावं लागलं. फक्त एकच सामना खेळला आणि त्याने 15 धावा केल्या. तसेच तीन विकेट घेतल्या. नऊ टी20 सामन्यातील सहा डावात 106 धावा केल्या असून 4 विकेट घेतल्या आहेत.