ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया टी 20i सीरिजचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया यांच्यात 5 टी 20i सामने होणार आहेत. या मालिकेला बुधवार 29 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. आशिया कप 2025 नंतर सूर्यकुमार यादव द्विपक्षीय मालिकेत नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहे. उभयसंघातील पहिला सामना हा कॅनबेरातील मानुका ओव्हलमध्ये होणार आहे. या सामन्याची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. मानुका ओव्हलमधील खेळपट्टी कुणासाठी फायदेशीर ठरणार? तसेच सामन्यादरम्यान पाऊस होण्याची किती शक्यता आहे? हे जाणून घेऊयात.
कॅनबेरातील मानुका ओव्हलमधील खेळपट्टी संथ राहिली आहे. ही खेळपट्टी मधल्या फळीतील फलंदाजांसाठी फायदेशीर ठरु शकते. त्यामुळे मिडल ऑर्डरमधील फलंदाजांकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे.
या मैदानात पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या ही 150 इतकी आहे. त्यामुळे चाहत्यांना हायस्कोअरिंग मॅच पाहायला मिळण्याची शक्यता कमी आहे. या मैदानात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 वर्षांपूर्वी टी 20i सामना खेळवण्यात आला होता. भारताने या मैदानात 5 वर्षांपूर्वी झालेल्या शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध विजय मिळवला होता. भारताने तेव्हा ऑस्ट्रेलीयासमोर 162 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताने त्या सामन्यात कांगारुंना 150 धावांवर रोखत 11 रन्सने विजय मिळवला होता. तेव्हा फिरकीपटू युझवेंद्र चहल याने कडक बॉलिंग करत भारताच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली होती.
फिरकी गोलंदाजांसाठी ही खेळपट्टी फायदेशीर ठरु शकते. या मैदानात डावखुऱ्या फिरकीपटूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. डावखुऱ्या फिरकीपटूंनी या मैदानात गेल्या 10 टी 20i सामन्यांमध्ये 20.30 च्या सरासरीने आणि 7.71 च्या इकॉनमीने 26 विकेट्स मिळवल्या आहेत. त्यामुळे कुलदीप यादव याच्याकडून भारताला अनेक आशा असणार आहेत.
कॅनबेरात आठवडाभर हवामान थंड असेल, असा अंदाज आहे. बुधवारी पाऊस होण्याची शक्यता आहे. मात्र काही वेळानंतर पाऊस थांबेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे काही वेळ पावसामुळे वाया जाणार हे निश्चित आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. तसेच हा सामना ढगाळ वातावरणात हा सामना होऊ शकतो. त्यामुळे एकूणच स्थिती पाहता आता बुधवारी टीम इंडिया विजयी सलामी देणार की यजमान मैदान मारणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.