आयसीसी वनडे वूमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील साखळी फेरीची सांगता 26 ऑक्टोबरला झाली. आता वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी 4 संघांमध्ये सेमी फायनलचा थरार रंगणार आहे. यजमान टीम इंडिया, गतविजेता ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या 4 संघांनी सेमी फायनलचं तिकीट मिळवलं आहे. उपांत्य फेरीला बुधवारी 29 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकने साखळी फेरीत उल्लेखनीय कामगिरी केली. त्यामुळे चाहत्यांना पहिल्याच उपांत्य फेरीतील सामन्यात चुरस पाहायला मिळू शकते.
दोन्ही संघांची साखली फेरीतील कामगिरी बरोबरीची राहिली आहे. दोन्ही संघांनी 7 पैकी 5 सामने जिंकले आहेत. मात्र दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडच्या तुलनेत 1 सामना गमावला आहे. दक्षिण आफ्रिकेने 7 पैकी 5 सामने जिंकलेत. तर 2 वेळा पराभूत व्हावं लागलं. तर दुसऱ्या बाजूला इंग्लंडने 7 पैकी 5 सामन्यांमध्ये विजय मिळवला. इंग्लंडला एकदा पराभूत व्हावं लागलं. तर 1 सामना पावसामुळे वाया गेला.
इंग्लंड साखळी फेरीत पॉइंट्स टेबलमध्ये 11 गुणांसह दुसऱ्या स्थानी राहिली. तर दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या स्थानी समाधान मानावं लागलं. दक्षिण आफ्रिकेच्या खात्यात 10 गुण होते. मात्र दक्षिण आफ्रिकेचा नेट रनरेट वाईट आहे. दक्षिण आफ्रिकेचा साखळी फेरीत -0.379 रनरेट राहिला. तर इंग्लंडचा रनरेट हा +1.233 असा होता.
दक्षिण आफ्रिका-इंग्लंड दोन्ही संघांनी या मोहिमेत साखळी फेरीतील आपला पहिला सामना एकमेकांविरुद्ध खेळला होता. इंग्लंडने 3 ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिकेचा 10 विकेट्सने धुव्वा उडवला होता. इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला 69 रन्सवर गुंडाललं. त्यानंतर 70 धावांचं आव्हान हे 14.1 ओव्हरमध्ये पूर्ण केलं होतं.
दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दोन्ही संघांचा हा सामना जिंकून वर्ल्ड कप ट्रॉफीच्या आणखी जवळ जाण्याचा प्रयत्न असणार आहे. इंग्लंड याआधी सलग 2 वेळा अंतिम फेरीत पोहचली आहे. त्यामुळे इंग्लंडकडे हा सामना जिंकून अंतिम फेरीत पोहचण्याची हॅटट्रिक करण्याची संधी आहे. तर दक्षिण आफ्रिकेकडे पहिल्या पराभवाची परतफेड करत इंग्लंडला सलग तिसऱ्यांदा फायनलमध्ये जाण्यापासून रोखण्याची दुहेरी संधी आहे. त्यामुळे आता दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत पोहचत पहिल्या पराभवाचा हिशोब करणार की इंग्लंड फायनलमध्ये पोहचण्याची हॅटट्रिक करणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.