ऑस्ट्रेलियन संघालाही अभिषेक शर्माची भीती, कर्णधार मिशेल मार्शने अशी दिली कबुली
GH News October 28, 2025 11:11 PM

आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये अभिषेक शर्माचा बोलबाला आहे. आतापर्यंत अभिषेक शर्माने आपल्या फलंदाजीतून हे दाखवून दिलं आहे. आशिया कप स्पर्धेतही अभिषेक शर्माने विरोधकांची दाणादाण उडवून दिली आहे. आता अभिषेक शर्मा नव्या आव्हानासाठी सज्ज झाला असून ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत कशी कामगिरी करतो याकडे लक्ष लागून आहे. असं असताना ऑस्ट्रेलियन संघाला त्याची धास्ती आतापासून लागली आहे. कारण अभिषेक शर्मा एकदा का टिकला तर गोलंदाजांचं काय खरं नाही. त्यात अभिषेक शर्माला बाद होण्याची भीतीही वाटत नाही. त्यामुळे त्याची आक्रमक खेळी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना त्रासदायक ठरणार हे नक्की आहे. असं असताना याबाबतची जाहीर कबुली ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने दिली आहे. इतकंच काय तर त्याच्या आव्हानासाठी सज्ज असल्याचं देखील सांगितलं आहे.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने पत्रकार परिषेदत प्रश्नांची उत्तरं देताना सांगितलं की, ‘अभिषेकमध्ये एक अविश्वसनीय प्रतिभा आहे. तो डावाची सुरुवात करताना संघासाठी टोन सेट करून देतो. आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी काय केलं आहे आम्ही सर्वांनी पाहीलं आहे. या टी20 मालिकेत तो निश्चितच आमच्यासाठी एक मोठं आव्हान असणार आहे. पण हेच आम्हाला हवं आहे. जगातील सर्वोत्तम फलंदाजाविरुद्ध तुम्हाला स्वत:ला पारखण्याची संधी मिळते. आम्ही त्याची आतुरतेने वाट पाहात आहोत.’ आता अभिषेक शर्मा पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत कशी कामगिरी करतो. याकडे लक्ष लागून आहे.

पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला भारतात टी20 वर्ल्डकप स्पर्धा होणार आहे. त्या दृष्टीन ही मालिका भारतासाठी खूपच महत्त्वाची आहे. मिचेल मार्शने सांगितलं की, ‘मागच्या दोन वर्ल्डकप स्पर्धेत आम्ही हवी तशी कामगिरी करू शकलो नाहीत. फलंदाजांनी आक्रमक खेळी केली आणि मागच्या काही वर्षात आम्ही पाहीलं आहे की, टी20 क्रिकेटमध्ये अशाच पद्धतीने संघांनी यश मिळवलं आहे. जर पुढच्या वर्षी होणाऱ्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत चांगली कामगिरी करायची असेल तर अशाच पद्धतीने पुढे जावं लागेल. मग काही टप्प्यांवर आम्हाला यश मिळालं नाही तरी चालेल.’

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.