इंग्लंड की दक्षिण अफ्रिका! वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीचं तिकीट कोणाला?
GH News October 28, 2025 11:11 PM

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम टप्पा सुरु झाला असून उपांत्य फेरीचा पहिला सामना इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात होत आहे. या सामन्यातील विजयी संघाला अंतिम फेरीचं तिकीट मिळणार आहे. त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघ विजयासाठी प्रयत्न करतील यात काही शंका नाही. हा सामना गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. या स्पर्धेत इंग्लंडने फक्त एक, तर दक्षिण अफ्रिकेने दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं आहे. त्यामुळे या सामन्यात कोणाची बाजू भक्कम हे उपांत्य फेरीच्या सामन्यात स्पष्ट होईल. दरम्यान या सामन्यात पाऊस पडला तर काय असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. कारण या स्पर्धेत काही सामने पावसामुळे होऊच शकले नाहीत. मग अंतिम फेरीचं तिकीट कोणाला मिळणार? चला तर मग जाणून घेऊयात.

इंग्लंडला मिळणार अंतिम फेरीचं तिकीट

उपांत्य फेरीच्या सामन्यात पाऊस पडला तर एक दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. 29 ऑक्टोबरला पावसामुळे सामना झाला नाही तर 30 ऑक्टोबरला खेळला जाईल. पण या दिवशीही सामना झाला नाही तर इंग्लंडला अंतिम फेरीचं तिकीट मिळेल. कारण साखळी फेरीत इंग्लंडची बाजू भक्कम आहे. दक्षिण अफ्रिकेपेक्षा इंग्लंडच्या पदरात एक गुण अधिक आहे. इंग्लंडने 7 पैकी 5 सामन्यात विजय, एका सामन्यात पराभव आणि एक सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे इंग्लंडचे 11 गुण आहेत आणि दुसर्‍या स्थानी आहे. तर दक्षिण अफ्रिकेने 7 पैकी पाच सामन्यात विजय आणि दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं आहे. त्यामुळे 10 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेत हे दोन्ही संघ दुसऱ्यांदा भिडणार आहेत. साखळी फेरीत दोन्ही संघ आमनेसामने आले होते. तेव्हा इंग्लंडने दक्षिण अफ्रिकेचा 10 गडी राखून धुव्वा उडवला होता. या सामन्यात नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागला होता आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली होती. दक्षिण अफ्रिकेचा संघ फक्त 20.4 षटकं खेळून 69 धावांवर सर्वबाद झाला होता. यानंतर हे आव्हान इंग्लंडने 14.1 षटकात एकही गडी न गमावता पूर्ण केलं होतं. त्यामुळे इंग्लंडची बाजू या स्पर्धेत भक्कम दिसत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.