World Cup 2025: प्रतिका रावलला नेमकं काय झालं, तिच्या जागेवर कोण खेळणार? BCCI ने अखेर दिले महत्त्वाचे अपडेट्स
esakal October 29, 2025 01:45 AM
  • भारतीय महिला संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध उपांत्य सामन्यापूर्वी मोठा धक्का बसला आहे.

  • फॉर्ममध्ये असलेल्या प्रतिका रावलला दुखापत झाल्याने ती स्पर्धेतून बाहेर झाली आहे.

  • तिच्या जागी शफाली वर्माला संधी देण्यात आली आहे.

भारतीय महिला संघाला गुरुवारी (३० ऑक्टोबर) ऑस्ट्रेलियाविरुद्ध महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेत उपांत्य सामना खेळायचा आहे. मात्र या महत्त्वाच्या सामन्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.

भारताची फॉर्ममध्ये असलेल्या सलीमी फलंदाज प्रतिका रावल दुखापतग्रस्त झाली आहे. तिला साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात क्षेत्ररक्षणादरम्यान दुखापत झाली असून आता तिच्याबाबत बीसीसीआयने मोठी अपडेट देताना सांगितले आहे की ती या स्पर्धेतून बाहेर झाली आहे. तिच्याऐवजी बदली खेळाडूचीही निवड झाली आहे.

World Cup 2025: टीम इंडियाला धक्का! सेमीफायनलपूर्वी प्रतिका रावल जखमी, चालू सामन्यात सोडावं लागलं मैदान; BCCI ने दिले अपडेट्स

रविवारी (२६ ऑक्टोबर) नवी मुंबईत भारताचा बांगलादेशविरुद्ध साखळी फेरीतील अखेरचा सामना होता. या सामन्यात पावसाचा मोठ्या प्रमाणात पावसाचा व्यत्यय आला होता. त्यामुळे सामना रद्द करण्यात आला होता.

सामना रद्द होण्यापूर्वी बांगलादेशने २७ षटकात ९ बाद ११९ धावा केल्या होत्या आणि भारतासमोर डकवर्थ लुईस नियमानुसार २७ षटकात १२६ धावांचे लक्ष्य होते. या लक्ष्याचा भारतीय संघ पाठलाग करत असताना ८.४ षटकात बिनबाद ५७ धावा झालेल्या असताना पावसामुळे सामना थांबला आणि नंतर हा सामनाच रद्द करण्यात आला. पण या सामन्यात प्रतिकाला दुखापत झाली.

बांगलादेश फलंदाजी करत असताना शर्मिन अख्तरने मारलेल्या शॉटवर चेंडू आडवताना प्रतिकाचा पाय घसरला होता. त्यामुळे तिला गुडघ्याला आणि घोट्याला दुखापत झाली आहे.

बीसीसीआयने माहिती दिली आहे की या दुखापतीमुळे तिला या स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले असून तिच्यावर बीसीसीआयची मेडिकल टीम लक्ष्य ठेवून आहे. ती लवकर बरी व्हावी यासाठी संघाने तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रतिकाने या संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये शानदार फलंदाजी केली होती. तिने स्मृती मानधनासोबत चांगली भागीदारीही केली होती. तिने न्यूझीलंडविरुद्ध शतकही ठोकले होते. प्रतिकाने वर्ल्ड कप २०२५ मध्ये ६ डावात ५१.३३ च्या सरासरीने ३०८ धावा केल्या आहेत.

बदली खेळाडूची निवड

दरम्यान, प्रतिका बाहेर झाल्याने तिच्या जागेवर आता २१ वर्षीय शफली वर्मालाबदली खेळाडू म्हणून संधी देण्यात आली आहे. खरंतर शफलीला यापूर्वीच वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात संधी न देण्यावरून बरीच चर्चा झाली होती. पण अखेर आता तिला संधी मिळाली आहे.

शफाली आता उपांत्य फेरीत स्मृती मानधनासोबत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलामीला फलंदाजी करताना दिसू शकते. शफालीने २०२३ मध्ये १९ वर्षांखालील भारतीय संघाला वर्ल्ज कर तिच्या नेतृत्वात जिंकून दिला होता. मात्र त्यानंतर तिला भारतीय संघात स्थान टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे.

तिने २९ ऑक्टोबर २०२४ रोजी भारतासाठी अखेरचा वनडे सामना न्यूझीलंडविरुद्ध अहमदाबादला खेळला आहे. त्यानंतर तिला भारताच्या वनडे संघात संधी मिळाली नाही. पण आता शफाली वर्ल्ड कपमध्ये खेळताना दिसू शकते. विशेष म्हणजे बरोबर एक वर्षाने तिला भारताच्या वनडे संघात पुनरागमनाची संधी मिळू शकते.

World Cup 2025 India Squad: वर्ल्ड कपच्या भारतीय संघात शफाली वर्माला स्थान का नाही? निवड समिती अध्यक्षांनी सांगितलं खरं कारण

वयाच्या १६ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या शफालीने २९ वनडे सामने खेळले असून ६४४ धावा केल्या आहेत. तसेच ५ कसोटीत तिने १ शतक आणि ३ अर्धशतकांसह ५६७ धावा केल्या आहेत. तिने भारतासाठी ९० टी२० सामनेही खेळले असून ११ अर्धशतकांसह २२२१ धावा केल्या आहेत.

वर्ल्ड कप २०२५ साठी बदललेला भारतीय महिला संघ -

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), हरलीन देओल, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, रेणुका सिंग ठाकूर, अरुंधती रेड्डी, ऋचा घोष (यष्टीरक्षक), क्रांती गौड, अमनजोत कौर, राधा यादव, श्री चरणी, स्नेह राणा, उमा छेत्री, शफाली वर्मा

राखीव खेळाडू : तेजल हसबनीस, प्रेमा रावत, प्रिया मिश्रा, मिन्नू मणी, सायली सातघरे

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.