नागपूर : पत्नीचे युवकाशी अनैतिक संबंध असल्याने पतीने डोक्यावर फावड्याने वार करून पत्नीचा खून केला. ही घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पंचशीलनगरात रविवारी (ता.२६) दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
रिंकी किशोर प्रधान (वय २३) असे मृत पत्नीचे नाव असून किशोर शंकर प्रधान (वय ३१) असे आरोपी पतीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर हा एका गॅरेजमध्ये काम करतो. कधी-कधी तो मजुरीलाही जातो.
पाच वर्षांपूर्वी त्याचे रिंकीशी लग्न झाले. अद्याप त्यांना अपत्य नव्हते. एका वर्षापूर्वी तिचे करण नावाच्या एका युवकाशी प्रेमसंबंध सुरू झाले. त्यानंतर ती त्याच्याशी व्हॉट्सॲप आणि व्हिडीओ कॉलवर बोलायची. ही बाब किशोरला माहिती पडली. त्यामुळे त्याने तिला समजाविण्याचा प्रयत्न केला. त्यातून दोघांमध्ये खटके उडत. २५ दिवसांपूर्वी रिंकी युवकासोबत अहमदाबाद येथे पळून गेली. त्यामुळे किशोर संतापला.
त्याने नातेवाईकांच्या मदतीने तिच्याशी संपर्क साधून नऊ दिवसांपूर्वी अहमदाबाद गाठले. तिथे युवकाची समजूत काढली. पत्नी रिंकीनेही त्याची माफी मागून यानंतर अशी चूक होणार नसल्याचे वचन दिले. त्यामुळे किशोर यांनी काही दिवस ती व्यवस्थित राहील्यावर पुन्हा तिने करणशी संपर्क साधला. तसेच त्याच्याशी व्हॉट्सॲप आणि व्हिडीओ कॉलवर बोलणे सुरू केले.
रविवारी (ता.२६) सकाळी किशोरला रिंकीच्या व्हॉट्सॲपमध्ये करणशी केलेले चॅटिंग दिसले. त्याने तिला विचारणा केली. मात्र, तिने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने किशोर संतापला. दोघांत वाद वाढला. त्यातून किशोरने घरात असलेल्या पावड्याने रिंकीच्या डोक्यावर वार करून तिला रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. त्यानंतर तिला लता मंगेशकर रुग्णालयात दाखल केले. तेथून मिळालेल्या माहितीच्या आधारे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय बन्सोड यांनी किशोरला ताब्यात घेतले. विचारणा केली असता त्याने पत्नीच्या डोक्यावर फावडा मारून तिचा खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत किशोरला अटक केली असून तपास सुरू केला आहे.
Maharashtra Crime : ती असुरक्षितच; साताऱ्यामध्ये महिला डॉक्टरने संपवली जीवनयात्रा, मुंबईमध्ये प्रेयसीला मारत प्रियकराने जीवन संपविले आधी केली डोके भिंतीवर आदळल्याची बतावणीकिशोरने रिंकीच्या डोक्यावर फावड्याने वार करून तिचा खून केला. मात्र, घराबाहेर येऊन त्याने गॅरेजमधील दोन सहकाऱ्यांना रिंकीचे डोके भिंतीवर आदळल्याने ती जखमी झाल्याची बतावणी केली. त्यामुळे दोघांच्या मदतीने त्याने लता मंगेशकर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. त्यानंतर त्याची सूचना एमआयडीसी पोलिसांना दिली. एमआयडीसी पोलिसांनी रुग्णालयात दाखल होऊन किशोरची विचारपूस केली. तेव्हा त्याने डोके भिंतीवर आदळल्याची माहिती दिली. मात्र, पोलिसी खाक्या दाखविल्यावर त्याने खुनाची कबूली दिली.