दोषींवर तात्काळ कारवाई करा
इंडियन मेडिकल असोसिएशन; महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २८ ः फलटण येथील शासकीय वैद्यकीय महिला अधिकारी यांच्या संशयास्पद व दुर्दैवी मृत्यूबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. या प्रकरणातील संबंधित प्रशासकीय व पोलिस अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई, न्यायालयीन देखरेखीखाली निष्पक्ष चौकशी आणि डॉक्टरांच्या संरक्षणासाठी धोरणात्मक सुधारणा करण्याची मागणी मुख्यमंत्र्याकडे केल्याची माहिती वूमन डॉक्टर्स विंग इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्राच्या संयोजिका डॉ. कांचन मदार यांनी दिली.
या तक्रारीतील संबंधित पोलिस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे तत्काळ निलंबन करून त्यांना अटक करावी, या प्रकरणाची न्यायालयीन देखरेखीखाली स्वतंत्र चौकशी करावी, तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांवर शिस्तभंगात्मक व कायदेशीर कारवाई करावी, डॉक्टरांसाठी गोपनीय मेन्टल हेल्थ अँड ग्रीव्हन्स रेड्रेसेल सेलची स्थापना करण्यात यावी, सरकारी रुग्णालयांत मानसिक आरोग्य प्रोटोकॉल व नियमित समुपदेशन असावे, डॉक्टरांसाठी व्हिस्टलब्लोअर संरक्षण धोरण लागू करावा, प्रत्येक जिल्ह्यात डॉक्टर वेल्फेअर नोडल ऑफिसर नेमणूक करावी, डॉक्टरांवरील प्रशासकीय व मानसिक छळालाही कायद्यात दंडनीय गुन्हा म्हणून समाविष्ट करण्याची मागणी केली आहे. यामध्ये ठोस कारवाई न झाल्यास निर्णायक भूमिका घेण्याचा इशारा असोसिएशनने दिला आहे.