हिंदुस्थान एरोनॉटिक्स-रशिया यांच्यातील करार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
विमाननिर्मिती क्षेत्रात ‘आत्मनिर्भरते’च्या दिशेने एक महत्वाचे पाऊल टाकताना भारताने रशियाशी प्रवासी विमान निर्मिती भारतात करण्याचा करार केला आहे. हा करार सोमवारी भारताची सार्वजनिक क्षेत्रातील विमान कंपनी ‘हिंदुस्थान एरोनॉटिक्स’ आणि रशियाची कंपनी ‘युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन’ यांच्यात करण्यात आला. या कराराच्या अंतर्गत भारतात रशियाच्या तांत्रिक साहाय्याने एसजे-100 या प्रवासी विमानाची निर्मिती केली जाणार आहे. रशियाबाहेर या विमानाची निर्मिती करणारा भारत हा जगातील प्रथमच देश ठरणार आहे.
एसजे-100 हे दोन इंजिने असणारे छोट्या आकाराचे विमान असेल. ते कमी अंतराच्या प्रवासासाठी लाभदायक ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने भारत सरकारने हाती घेतलेल्या ‘उडान’ योजनेकरीता हे विधान अनुकूल असेल. या योजनेचा प्रारंभ 2016 मध्ये करण्यात आला होता. टायर टू अणि टायर थ्री शहरांमध्ये विमान संपर्क वाढविण्यासाठी ही योजना हाती घेण्यात आली आहे. सध्या 200 हून अधिक एसजे-100 विमाने भारतात कार्यरत असून 16 प्रवासी विमान कंपन्या त्यांचा उपयोग करतात, अशी माहिती देण्यात आली.
एचएएलला मिळणार अधिकार
भारत आणि रशिया यांच्यातील करारानुसार या विमानांचे उत्पादन भारताच्या अंतर्गत उपयोगासाठी करण्याचा अधिकार हिंदुस्थान एरोनॉटिक्स या कंपनीला मिळणार आहे. प्रवासी विमानाची संपूर्ण निर्मिती भारतात प्रथमच केली जाणार आहे. कित्येक दशकांपूर्वी भारताने असा प्रकल्प हाती घेतला होता. तथापि, तो 37 वर्षांपूर्वी बंद पडला होता. 1961 मध्ये याच हिंदुस्थान एरोनॉटिक्सने ‘अॅव्हरो एचएस-748 हे विमान निर्माण करण्याचा प्रकल्प हाती घेतला होता. तथापि, निर्णय घेण्यातील दिरंगाई आणि अपुरा निधी यामुळे हा प्रकल्प 1988 मध्ये बंद पडला. आता रशियाच्या साहाय्याने प्रवासी विमान निर्मितीचा नवा प्रकल्प हाती घेण्यात आला असून तो यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
विमानांची आवश्यकता वाढणार
भारतात नागरी विमान वाहतूक क्षेत्राचा विस्तार होत आहे. त्यामुळे पुढच्या 10 वर्षांमध्ये भारताला किमान 200 छोट्या आकाराच्या विमानांची आवश्यकता भासणार आहे. या विमानांची निर्मिती आता भारतातच होणार असल्याने भारत छोट्या प्रवासी विमानांच्या निर्मितीत आत्मनिर्भर होणार आहे. यातून भविष्यात मोठी विमाने निर्माण करण्यापर्यंतही भारताची प्रगती होऊ शकते, असा विश्वास अनेक मान्यवरांनी व्यक्त केला. या प्रकल्पामुळे भारताचे विमानांच्या संदर्भातले परकीय अवलंबित्व कमी होणार असून ही बाब महत्वाची मानण्यात येत आहे.
रशियाशी संबंध भक्कम
या करारामुळे भारताचे रशियाशी संबंध अधिक भक्कम होणार आहेत. सध्या अमेरिकेने भारतावर रशियाकडून तेल खरेदी न करण्याविषयी दबाव आणला आहे. मात्र, भारत आणि रशिया यांच्यात अनेक दशकांपासून मैत्रीचे संबंध आहेत. कोणचाही दबाव आला तरी, भारताने रशियाशी संबंध मजबूत करण्याचा निर्धार केला असून त्याचे प्रत्यंतर या करारातून येत आहे, असे तज्ञांचे मत आहे.
अनेक वैशिष्ट्यो…
ड प्रवासी क्षमता 103, अंतर क्षमता 3 हजार 530 किलोमीटर्सपर्यंत
ड इंधनाची बचत होणार, प्रवासाचा खर्च अन्य विमानांपेक्षा बरच कमी
ड कोणत्याही हवामानात प्रवास शक्य, त्यामुळे संपूर्ण भारतभर उपयुक्त
ड उणे 55 डिग्री सेल्शियस ते 45 डिग्री सेल्शियस तापमानात कार्यरत
ड अत्याधुनिक आणि सुरक्षित तंत्रज्ञान, डिजिटल पद्धतीने नियंत्रण शक्य
ड विमान निर्मिती क्षेत्रात आत्मनिर्भरता मिळविण्यासाठी हा करार उपयुक्त