MPSC Success Story : 'लेकीच्या जिद्दीला मंद्रुळकोळेकरांचा सलाम'; एमपीएससीत यशस्वी झालेल्या मेघा सावंत-पाटील यांचा माहेरी सत्कार
esakal October 29, 2025 01:45 PM

ढेबेवाडी : सैन्य दलात कार्यरत पतीच्या निधनानंतर खचून न जाता पुन्हा जिद्दीने उभे राहात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या आणि नुकतीच जलसंपदा विभागात कालवा निरीक्षकपदी नियुक्ती झालेल्या धामणी (ता. पाटण) येथील श्रीमती मेघा अमर सावंत-पाटील यांचा माहेरी मंद्रुळकोळे खुर्द (ता. पाटण) येथील ग्रामस्थांनी सत्कार करून हुशार, कर्तबगार लेकीच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली.

Motorcycle Expedition: सैन्यवीरांच्या पुढाकाराने मोटारसायकल मोहीम; अपशिंगेत समारोप; लेफ्टनंट कर्नल सौरभ हून यांचे नेतृत्व

मेघा सावंत- पाटील यांचे मूळ गाव मंद्रुळकोळे खुर्द आहे. २०११ मध्ये धामणी येथील भारतीय सैन्य दलात कार्यरत अमर सावंत यांच्याशी त्यांचा विवाह झाला. अमर हे चांगले खेळाडूही होते. २०१३ मध्ये सेवेत असताना त्यांचे निधन झाले आणि मेघा यांच्यावर आभाळच कोसळले. हे डोंगराएवढे मोठे दुःख बाजूला सारून त्या पुन्हा जिद्दीने उभ्या राहिल्या. त्यांनी स्पर्धा परीक्षेतून पुन्हा उभे राहण्याचा निश्चय केला. एमपीएससी परीक्षेत २०२३ व २०२४ च्या परीक्षेत त्यांनी यश संपादन केले.

मुंबई महानगरपालिका व पुणे आरोग्य विभागात कार्यकारी सहाय्यक आणि जलसंपदा विभागामध्ये कालवा निरीक्षक म्हणून त्यांना संधी उपलब्ध झाली असून, सध्या त्या शेणोली (कऱ्हाड) येथे जलसंपदा विभागात रुजू झाल्या आहेत. नुकताच माहेरी मंद्रुळकोळे खुर्द येथील ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार करून लेकीच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली. याप्रसंगी उपसरपंच संजय लोहार, प्रा. पंढरीनाथ कापसे, बजरंग पाटील, अविनाश कापसे, प्रकाश ऊर्फ बबलू पाटील, सचिन लोहार, लालासाहेब पाटील आदींसह कुटुंबीय, ग्रामस्थ उपस्थित होते.

Honesty Story : 'ओवीने प्रामाणिकपणे परत केला सुवर्णहार'; खेळताना सापडला पाच तोळे सोन्याचा हार

जीवनात संकटे आली, तरी खचू नका, मार्ग काढत पुढे जा. स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचेच या जिद्दीने मी वाटचाल केली. भरपूर मेहनत घेतली आणि यश संपादन केले. सासर आणि माहेरच्या मंडळींनी मला चांगले पाठबळ दिले, त्यामुळेच इथपर्यंत पोहोचता आले.

- मेघा सावंत-पाटील

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.