Akola : पूजेच्या ताटात ठेवलेली पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी गाईने गिळली; 'मेटल डिटेक्टर'ने लावला अंगठीचा शोध, नेमकं काय घडलं?
esakal October 30, 2025 12:45 AM

पथ्रोट (अकोला) : पूजेच्या ताटात ठेवलेली पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी (Gold Ring) नैवेद्यासोबत नजरचुकीने गाईला खाऊ घालण्यात (Murhadevi Akola News) आल्याची घटना भाऊबीजेच्या दिवशी मुऱ्हादेवी येथे घडली. ही चूक लक्षात आल्यावर घरातील अख्खे कुटुंब चिंतेत होते. परंतु पथ्रोट येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. रोशन वेरुळकर यांनी मेटल डिटेक्टरद्वारे शोध घेऊन गाईवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्यानंतर ती सोन्याची अंगठी बाहेर काढून कुटुंबाच्या हवाली करण्यात आल्याची अफलातून घटना येथे घडली.

मुऱ्हादेवी येथील रहिवासी असलेले पोलिस पाटील तुळशीराम पखान यांच्या मुलीने भाऊबीजेच्या दिवशी ओवाळणीकरिता पूजेच्या साहित्यासोबत ताटात सोन्याची पाच ग्राम वजन असलेली अंगठी ठेवली होती. कार्यक्रमानंतर पूजेच्या ताटात ठेवलेले इतर साहित्य व नैवेद्य गाईला भरवितांना नेमके त्याच वेळी नजरचुकीने साहित्या सोबत ताटात ठेवलेली अंगठी सुद्धा गाईला खाऊ घालण्यात आली.

'स्टॅच्यू ऑफ नॉलेज'ला मिळाली प्रशासकीय मान्यता; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 75 फूट उंच पुतळ्यासाठी मंजूर होते 10 कोटी

पखान यांनी स्थानिक डॉक्टरांकडून त्या गाईवर उपचार केले व शेणावाटे अंगठी बाहेर येण्याची वाट पाहिली. सतत चार दिवस हा नित्यक्रम सुरू राहिला. परंतु त्यामध्ये यश आले नाही. मग स्थानिक डॉक्टरांनी पथ्रोट येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. रोशन वेरुळकर यांच्याकडून पुढील उपचार घेण्याचा सल्ला दिला. सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर डॉ. वेरुळकर यांनी आपले सहकारी डॉ. आदेश चोपडे यांना सोबत घेऊन मुऱ्हा येथे जाऊन सदर गाईची मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी करून पोटात धातू असल्याची खात्री करून घेतली.

ही धातूमय वस्तू शस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढण्यात येते असे पशुपालकास सांगितले. त्यानंतर दीड तासाच्या शस्त्रक्रियेनंतर गायीच्या पोटातून सोन्याची अंगठी तसेच पाच नाणे व बशीचा तुकडा सुद्धा यशस्वीरीत्या बाहेर काढून अंगठी पशुपालकाच्या स्वाधीन केली. शस्त्रक्रियेनंतर गाईने लगेच पूर्ववत खाणे-पिणे सुरू केले असून गाय आता स्वस्थ आहे.

गाईला अमरावतीला नेऊन एक्स-रे काढणे, अंगठीचा शोध घेऊन त्यानंतर शस्त्रक्रिया करणे ही खर्चिक व अशक्य बाब होती. त्यामुळे जाग्यावरच मेटल डिटेक्टरद्वारे धातूचा शोध घेऊन शस्त्रक्रिया केली. जी यशस्वी ठरली आहे.

- डॉ. रोशन वेरुळकर, पशुधन विकास अधिकारी, पथ्रोट.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.