दहशतवाद विरोधी पथक ATS ने पुण्यातून जुबेर हंगरगेकर या सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक केली आहे. जुबेरवर तो अल कायदा दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचा संशय आहे. 27 ऑक्टोंबरला पुण्यातील कोंढवा परिसरातून त्याला अटक करण्यात आली आहे. जुबेर हंगरगेकरकडे कुख्यात दहशतवादी लादेनच्या भाषणाचे उर्दू भाषांतर सापडले. त्याशिवाय हंगरगेकर जवळ अल कायदा इन्स्पायर मासिकातील एके 47 रायफलने गोळीबार करण्याची आणि बॉम्ब तयार करण्याच्या पद्धतीचे छायाचित्र व माहिती आढळून आली आहे.
जुबेरच्या संपर्कात किती कट्टरतावादी तरुण मुले आहेत, त्याने अलकायद्याचे सदस्य बनण्यासाठी आणखी कोणाची मनधरणी केली, याचा तपास एटीएसकडून केला जात आहे.जुबेर हंगरगेकर उच्चशिक्षित असून आयटी कंपनीत लाखोचे पॅकेज तो घेतो. आरोपी जुबेर हंगरगेकरला 4 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
19 लॅपटॉप आणि 40 मोबाइल फोन जप्त
जुबेर हंगरगेकरने महाराष्ट्राच्या कुठल्या शहरात घातपात घडवण्याचा कट रचलेला? याची माहिती पोलीस गोळा करत आहेत. एटीएसने सोमवारी पुण्यात 10 ठिकाणी छापेमारीची कारवाई केली. एटीएसने या कारवाईत 19 लॅपटॉप आणि 40 मोबाइल फोन जप्त केले. जुबेर विरोधात अनधिकृत कायदे प्रतिबंधक कायदा यूएपीएअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मूळचा सोलापूरचा असलेला जुबेर हंगरगेकर विवाहित आहे. त्याला दोन मुलं आहेत. कल्याणीनगरमधील एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीला आहे.
त्याने कुठली योजना आखलेली का?
जुबेर हंगरगेकरकडे जे साहित्य सापडलं ते अल-कायदा या दहशतवादी संघटनेची संबंधित आहे. ओसामा बिन लादेश अल-कायदाचा प्रमुख होता. अमेरिकेने 2011 साली नेवी सीलच्या कमांडो कारवाईत लादेनला संपवलं. त्यानंतर त्याच्या संघटनेच्या सुद्धा मुसक्या आवळल्या. आज ISIS ही दहशतवादी संघटना सर्वात प्रभावी आहे. जुबेरवर अलकायदा कितपत प्रभाव आहे. त्याने कुठली योजना आखलेली का? हे साहित्य बाळगण्यामागे त्याचा उद्देश काय होता? ही सर्व माहिती त्याच्या चौकशीतून समोर येईल. त्याचा मोबाइल, लॅपटॉपमधून सुद्धा डेटा रिकव्हर केला जाईल. तो अन्य कुठल्या दहशतवाद्यांच्या संपर्कात होता का? हे शोधलं जाईल. सध्या त्याच्याकडून जप्त केलेल्या साहित्याची डिजिटल फॉरेन्सिक तपासणी सुरु आहे.