Sanjay Raut : नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यावरुन संजय राऊत यांचा गंभीर आरोप
Tv9 Marathi October 30, 2025 12:45 AM

“गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात बच्चू कडू यांचं आंदोलन सुरु आहे. ते तोंडाला पट्टी बांधून का बसलेत?. बच्चू कडू यांना शहरी नक्षलवादी ठरवण्याचा प्रयत्न होत आहे. ज्या राज्यात कोणीही आंदोलन केलं, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, निवडणुकीच्या, मतदारच्या यादीच्या, बेरोजगारीच्या प्रश्नावर. तर सगळ्यांना अरबन नक्षलवादी ठरवायचं, यात माओवादी घुसलेत असं घोषित करुन टाकायचं” अशी टीका संजय राऊत यांनी केली. “आता बच्चू कडू एक आंदोलन करतायत. कालपर्यंत ते तुमच्यासोबत होते. बच्चू कडू आणि देवेंद्र फडणवीस हे गळ्यात गळे घालून फिरत होते. पण आता बच्चू कडू यांच्यासोबत जे सहकारी या आंदोलनात सहभागी झालेत, हजारोंच्या संख्येने लोक त्यांच्या बरोबर चालतायत, ते नक्षलवादी झालेत. सातबारा कोरा करा ही मागणी मूळची उद्धव ठाकरे यांची आहे” असं संजय राऊत म्हणाले.

“सातबारा कोरा करा, नाहीतर चालते व्हा, ही मागणी उद्धव ठाकरे यांची आहे. त्या मागणीने पुन्हा जोर धरला असला तरी आंदोलकांना अर्बन नक्षलवादी ठरवणं कितपत योग्य आहे?. आंदोलन केलं की, अर्बन नक्षलवादी ठरवायचं. मग, भ्रष्टाचाऱ्यांना अर्बन नक्षलवादी का ठरवत नाहीत?. तुमच्या मंत्रिमंडळात बसलेत त्यांना अर्बन नक्षसी का ठरवत नाही?” असा सवाल संजय राऊतयांनी विचारला.

सिंहस्थ कुंभमेळ्यावरुन काय आरोप?

“नाशिक त्र्यंबक सिंहस्थ कुंभमेळा होतो आहे, तिथे पावलापावलावर भ्रष्टाचार होत आहे. साधारण 15 ते 20 हजार कोटींच बेजट गुजरातच्या ठेकेदारांना वाटून द्यायचं . गुजरातच्या ठेकेदारांनी महाराष्ट्रातल्या छोट्या-मोठ्या ठेकेदारांना मेहेरबानी खात्यात काम द्यायची. हे सध्या गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांचं काम सुरु आहे” असा आरोप संजय राऊत यांनी केला.

शेतातून रस्ते काढण्याची काय गरज आहे?

“काल शेतकरी माझ्याकडे आले होते. रोड वायडनिंगच्या नावाखाली नाशिक-त्र्यंबक रस्त्याचं विस्तारीकरण सुरु आहे. त्याची गरज नाहीय. नाशिक महानगर विकास प्राधिकरण दोन्ही बाजूंची जागा ताब्यात घेऊन शेतकऱ्यांच्या घरावर, व्यवसायावर बुलडोझर फिरवून हजारो शेतकऱ्यांना उद्धवस्त, बेरोजगार करत आहे. याची गरज नाही. शेतकरी उपोषणाला बसलेत. राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात, सर्वकाही आलबेल आहे. कोणावर अन्याय होणार नाही. नाशिकमध्ये 16 गावचा शेतकरी उद्धवस्त झालाय. शेतातून रस्ते काढण्याची काय गरज आहे?. मुख्यमंत्र्यांकडे जाऊन शेतकरी थकले आहेत. राज्यात कमालीची अस्थिरता आहे” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.