भारतीय तरुणाला युएईत लागली तब्बल 240 कोटींची लॉटरी; एका रात्रीत नशीबच पालटलं, विजेत्या या रकमेचं काय करणार?
ET Marathi October 30, 2025 02:45 PM
संयुक्त अरब अमिरात (UAE) मध्ये राहणाऱ्या एका भारतीय नागरिकाने देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा लॉटरी पुरस्कार जिंकून इतिहास रचला आहे. अबू धाबी येथे वास्तव्यास असलेल्या 29 वर्षीय अनिल कुमार बोल्ला माधवराव बोल्ला यांनी युएई लॉटरीचा पहिला 100 मिलियन दिरहमचा (Million Dirham) जॅकपॉट जिंकला आहे, ज्याचे भारतीय चलनात अंदाजित मूल्य सुमारे 240 कोटी रुपये आहे. युएई लॉटरीने सोमवारी व्हिडिओ जारी करून अनिल कुमार यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आणि त्यांचे अभिनंदन केले.



नशिब असावं तर असंरिपोर्टनुसार, हा ऐतिहासिक ड्रॉ 23व्या लकी डे इव्हेंट अंतर्गत काढण्यात आला होता. विजयानंतर अनिल कुमार यांनी 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर शेअर केलेल्या मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये म्हटले की, "हा एक भाग्यवान दिवस आहे जो आम्ही कधीही विसरू शकणार नाही."



अनिल कुमार यांनी सांगितले की, त्यांनी आपला विजयी क्रमांक निवडण्यासाठी "ईझी पिक" (Easy Pick) पर्यायाचा वापर केला, ज्यामध्ये 'डेज सेट' मधून स्वयंचलित निवड झाली. मात्र, 'महिन्यांच्या सेट'मधून त्यांनी 11 हा क्रमांक मुद्दाम निवडला, कारण तो त्यांच्या आईच्या वाढदिवसाचा महिना आहे. त्यांनी कोणतेही 'जादू' किंवा 'गुपित' वापरले नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी एकाच वेळी 12 तिकीटं खरेदी केली होती. लॉटरी जिंकल्याचे कळल्यावर त्यांना विश्वासच बसत नव्हता, "मी सोफ्यावर बसलो होतो आणि फक्त 'हो, मी जिंकलो' अशी भावना होती," असे त्यांनी आठवणीने सांगितले.



विजेता पैशांचे काय करणार ?या मोठ्या रकमेचा वापर जबाबदारीने कसा करायचा यावर आता अनिल कुमार यांचे लक्ष आहे. ते म्हणाले, "मी फक्त ही रक्कम कशी गुंतवणूक करायची आणि योग्य मार्गाने खर्च करायची याचा विचार करत आहे."



त्यांनी आपल्या इच्छा व्यक्त करताना सांगितले की, या पैशातून त्यांना एक सुपर कार खरेदी करायची आहे आणि एका आलिशान रिसॉर्टमध्ये (Luxury Resort) विजयाचा जल्लोष करायचा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्यांना आपल्या कुटुंबाला युएईमध्ये आणून त्यांच्यासोबत संपूर्ण आयुष्य जगायचे आहे. "माझ्या आई-वडिलांची खूप छोटी-छोटी स्वप्ने आहेत आणि मला ती सर्व पूर्ण करायची आहेत," असे ते म्हणाले.



दान आणि इतरांना संदेशया तरुण विजेत्याने या अनपेक्षित निधीतील काही भाग दान (Charity) करण्याचा निर्णय घेतला आहे. "ज्यांना खरोखर पैशांची गरज आहे, त्यांच्यापर्यंत हे दान पोहोचेल असा माझा विश्वास आहे," असे त्यांनी सांगितले. इतर लॉटरी खेळणाऱ्यांना संदेश देताना त्यांनी म्हटले, "माझा विश्वास आहे की प्रत्येक गोष्ट काहीतरी कारणास्तव घडते. खेळत राहा, आणि खात्री बाळगा, एक दिवस नशीब तुमच्या बाजूने असेल." त्यांनी युएई लॉटरी आयोजकांचे आभार मानले आणि ही एक "अतिशय मोठी संधी" असल्याचे नमूद केले.
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.