'दुबार'नावांवर पुन्हा मतदान
esakal October 30, 2025 02:45 PM

‘दुबार’ नावांवर पुन्हा मतदान
मतदार यादीबाबत राजकीय पक्षांच्या तक्रारी, पालिकेचे निवडणूक विभाग अनभिज्ञ
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २९ : बेलापूर, ऐरोली विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत ७६ हजार दुबार नावे असल्याची तक्रार ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे काँग्रेसने केली आहे. त्यानुसार मतदार यादी पडताळण्याचे काम सुरू आहे. मात्र निवडणूक आयोगाच्या १ जुलै रोजी प्रसिद्ध यादीनुसार नवी मुंबई महापालिकेचे निवडणूक विभाग काम करीत असल्याने दुबार नावांवर बोगस मतदान होण्याची दाट शक्यता आहे.
मतदान प्रक्रियेत बोगस मतदान होऊ नये, याकरिता निवडणूक आयोगातर्फे विविध क्लृप्त्या वापरल्या जातात. अधिकृत मतदारांकडून कागदपत्रे आणि ओळखपत्रे दिल्यानंतर मतदान करण्याचा अधिकार मिळतो. मात्र बोगस मतदार राजरोसपणे थेट मतदानाचा हक्क बजावून जात असतात. त्यामुळे अशा मतदारांवर अंकुश आणण्यासाठी प्रशासनाकडे काँग्रेससह इतर राजकीय पक्षांनीही तक्रार केली आहे. बेलापूर आणि ऐरोली या दोन्ही विधानसभा मतदारसंघांत एकूण ७६ हजार दुबार नावे आहेत. त्यापैकी ऐरोली विधानसभा मतदारसंघात ४१ हजार ५५६ दुबार नावे आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघात ३५ हजारांच्या आसपास दुबार नावे असल्याचा दावा राजकीय पक्षांनी केला आहे. विशेष म्हणजे ऐरोलीतील नावे बेलापुरातही आहेत. त्यामुळे पालिकेच्या निवडणुकीत दोन्ही विधानसभांतील केंद्रांवर एकाच नावाच्या व्यक्ती बोगस मतदान करण्याची भीती व्यक्त होत आहे.
---------------------------------------
पामबीच मार्गावर २५० मतदार
जुईनगर परिसरात एका मतदाराच्या नावापुढे राहण्याचा पत्ता सुलभ शौचालय असल्याने मनसेने निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. तसेच पाम बीच मार्गावर तब्बल २५० मतदारांचा पत्ता असल्याची नोंद मतदार यादीत आहे. अशा पत्त्यावर कोण राहत आहेत की नाही, याची शहानिशा करण्यासाठी आज मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी पाम बीच मार्गावर सर्वेक्षण केले. पाम बीच मार्गावर धावणाऱ्या वाहनचालकांना थांबवून पाम बीचवर राहतात का, असा प्रश्न विचारला. या वेळी मनसेने बोगस नावांवरून प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.
-----------------------------------
राजकीय पक्ष आक्रमक
काँग्रेससोबत शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीतील इतर मित्रपक्षांतील नेत्यांनी दुबार नावे रद्द करण्याची मागणी केली. त्यानुसार बेलापूर आणि ऐरोली विभागात दुबार नावे आणि पत्ते नसलेली नावे रद्द करण्याचे काम सुरू असल्याचे सहाय्यक निवडणूक अधिकारी विकास गरुड यांनी सांगितले. नावे रद्द केल्यानंतरचा अहवाल निवडणूक विभागाला सादर केला जाणार आहे. त्यानंतर अहवालावर राज्य निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे.
------------------------------------
११ नोव्हेंबरला आरक्षण सोडत
नवी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता लवकरच आरक्षण सोडत होणार आहे. येत्या ११ नोव्हेंबरला महापालिकेच्या प्रभागांकरिता आरक्षण जाहीर होणार आहे. एससी, एसटी, ओबीसी आणि महिला गटातून आरक्षण जाहीर होणार आहे.
----------------------------------
राज्य निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ला प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीनुसार काम करीत आहोत. नावे वगळण्याचे अधिकार आम्हाला नाहीत. आयोगाने जाहीर केलेल्या यादीनुसार निवडणुकीचे काम सुरू आहे.
- डोईफोडे, निवडणूक विभाग, उपायुक्त, नवी मुंबई पालिका
------------------------------------

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.