पारगाव, ता. २९ : खडकवाडी (ता. आंबेगाव) ते धामणीफाटा रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यावरून वाहन चालविताना वाहनचालकांनी मोठी कसरत करावी लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी माजी सरपंच अनिल डोके आणि ग्रामस्थांनी केली आहे.
खडकवाडी ते द्रोणागिरीमळा (धामणीफाटा) रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहे. खड्ड्यात पावसाचे पाणी साचून डबकी तयार झाली आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. लोणी गावाजवळ असलेल्या ओढ्यावरील पुलाचे काम सुरू असताना लोणी रस्ता बंद केला होता. त्यामुळे मागील दोन आठवडे मंचर लोणी रस्त्यावरील वाहतूक या रस्त्याने खडकवाडी मार्गे लोणीला वळविण्यात आली होती. त्यावेळी या रस्त्याने मोठ्या प्रमाणात वाहने गेल्याने मोठ्या मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याची दयनीय अवस्था झाली असल्याचे गुलाब वाळुंज यांनी सांगितले.
06284