गुळुंचे येथे विकासकामांना जागेची वाणवा
esakal October 31, 2025 01:45 AM

गुळुंचे, ता. २९ ः गुळुंचे (ता. पुरंदर) येथे दिवसेंदिवस मोकळ्या जागेची उणीव निर्माण होत आहे. यात्रा, उत्सव तसेच विकासकामांना जागेची वाणवा भासत आहे. वाढत्या लोकसंख्येला राहण्यास देखील गावठाणातील जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे आगामी काळात काटेबारस यात्रेसह विकासकामांना खीळ बसण्याची शक्यता आहे.
राज्यात प्रसिद्ध असलेल्या काटेबारस यात्रेचा १२ दिवसांचा उत्सव सुरू असून, यात्रेनिमित्ताने दुकाने थाटण्यासाठी, तसेच मनोरंजनाचे कार्यक्रम घेण्यासाठीही यंदा जागेची उपलब्धता होत नव्हती. मात्र, गायकवाड कुटुंबीयांनी इनामी जागा उपलब्ध करून दिल्याने किमान यंदाचा तरी जागेचा प्रश्न मिटला आहे. मात्र, यात्रा, उत्सवांसाठी स्वतंत्र जागा आरक्षित करण्याची गरज यानिमित्ताने जाणवली आहे.
गावाच्या गावठाणाची निर्मिती सन १९७८- ७९ मध्ये झाली. पूर्वी गावातील बारा बलुतेदार, पाटील, देशमुख, देवस्थान तसेच कुलकर्णी, देशपांडे व केंजळे यांना जागा वाटप करण्यात आल्याचे जुने दस्तऐवज उपलब्ध आहेत. मुख्य गावठाणाच्या नजीकची बहुतांशी जागा ही मठ, इनाम वर्ग तीन व भोगवटादार वर्ग दोन च्या आहेत. दिवसेंदिवस गावाची लोकसंख्या वाढत गेली परंतु, गावठाणाची हद्दवाढ झाली नाही.
ग्रामपंचायतीकडून सन २०१७ मध्ये गावठाण हद्दवाढीचा प्रस्ताव दिला होता. मात्र, गावठाण हद्दवाढ करण्याचा निर्णय शासनाने तुकडेबंदी कायद्याच्या धर्तीवर निरसित केल्याने हद्दवाढ झाली नाही. गावाची हद्दवाढ होऊन पीएमआरडीएच्या कक्षेत गाव यावे यासाठी नीरा, गुळुंचे आदी दक्षिण पूर्व पट्ट्यातील काही ग्रामपंचायतीनी शासन दरबारी अर्ज केले. मात्र, आजतागायत खेड्यांच्या गावठाण वाढीच्या प्रश्नांचे भिजते घोंगडे कायम आहे.
येथील देवस्थानला तीर्थक्षेत्र विकासाचा ‘ब’ वर्ग दर्जा असून, विकासासाठी जवळपास सव्वा तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. परंतु, गावाला वाढीव गावठाण नसल्याने विकासकामे करण्यात अडचणी येत आहेत.

सरकारी जागांवर अतिक्रमण
जागेच्या अभावी घरकुल योजना लटकल्या असून, अनेक पात्र लाभधारक स्वमालकीची जागा नसल्याने या योजनेपासून गेल्या १५ वर्षांपासून वंचित आहेत. सरकारी पशुवैद्यकीय दवाखाना देखील नव्या इमारतीच्या प्रतीक्षेत असून, जागेअभावी त्याचेही काम रखडले आहे. गावठाण मर्यादित असल्याने बहुतांशी लोकांनी शेतजमिनीत घरे बांधली आहेत, तर अनेकांनी सरकारी जागांवर अतिक्रमण केले आहे. येथील तुकाई डोंगराच्या उतारावर राहणाऱ्या देऊळवाले समाजाच्या अनेक कुटुंबांना घरकुल मंजूर आहे. मंडल अधिकारी वाल्हे यांनी जागा मंजुरीचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर गेल्या पाच वर्षांपूर्वी पाठवला असून, त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही. जागेच्या अभावी अतिक्रमण वाढून गावची दशा होत असून, यावर मार्ग काढण्याची आवश्यकता आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.