माळशिरस, ता. २९ : ‘‘सोमेश्वर साखर कारखान्याचा यंदाचा किमान हमीदर ३२८५ रुपये इतका असून, वेळेवर पैसे देण्यास आणि ऊस तोडणीसाठी कारखान्याची सर्व यंत्रणा कटिबद्ध आहे. सोमेश्वर कारखान्याने ऊस उत्पादकांसाठी नवीन प्रकल्प सुरू केले असून, त्यातून शेतकऱ्यांना थेट फायदा होईल,’’ असे मत कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी व्यक्त केले.
पिसर्वे (ता. पुरंदर) येथील प्रगतशील शेतकरी मारुती शांताराम कोलते यांच्या शेतात कारखान्याचा सन २०२५- २६ या वर्षातील फडपूजन करण्यात आले. यावेळी जगताप बोलत होते. कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, पिसर्वे गावचे माजी सरपंच शांताराम कोलते यांच्या हस्ते पारंपरिक विधी व कार्यक्रमाचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी उसाला पुष्पहार घालून फडपूजन केले. यावेळी शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान विषयी माहिती दिली.
या कार्यक्रमास उपाध्यक्ष मिलिंद कांबळे, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, संचालक राजवर्धन शिंदे, ऋषिकेश गायकवाड, जितेंद्र निगडे, हरिभाऊ भोंडवे, बाळासाहेब कामथे, लक्ष्मण गोफणे, आनंदकुमार होळकर, सरपंच रवींद्र कोलते, उपसरपंच चंद्रकांत कोलते, तसेच परिसरातील कारखान्याचे सभासद व ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश कोलते यांनी, तर मारुती कोलते यांनी आभार मानले.
02674