 
            ‘बुलेट ट्रेन’च्या धर्तीवर शेतकऱ्यांना मोबदला
 कूळ शेतकऱ्यांना आता ९० टक्के रक्कम मिळणार
वज्रेश्वरी, ता. ३० (बातमीदार) : विरार-अलिबाग कॉरिडॉर प्रकल्पासाठी भिवंडी तालुक्यातील १४ गावांमधील जमिनी संपादन केलेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे दोन मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या जमिनींना बुलेट ट्रेनसाठी दिलेल्या दराप्रमाणे मोबदला देण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बाजूने हे दोन्ही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
भिवंडी तालुक्यातील १४ गावांमधील जमिनी संपादित करताना गुणांक १ आणि गुणांक २ नुसार वेगवेगळे दर निश्चित झाले होते. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी याच भागातील जमिनींना गुणांक २ नुसार दर मिळाला असल्याने, विरार-अलिबाग कॉरिडॉरसाठीही तोच दर मिळावा, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. महसूलमंत्र्यांनी ही मागणी मान्य केली असून, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांना तातडीने बुलेट ट्रेनच्या धर्तीवर (गुणांक २) मोबदला देण्यासाठी प्रस्ताव तयार करून ‘एमएसआरडीसी’कडे पाठवण्याचे आदेश दिले आहेत.
निर्णयाचा लाभ होणारी गावे : 
अंजुर, दिवेअंजुर, आलिमघर, भरोडी, केवणी, कशेळी, काल्हेर, कोपर, डुंगे, वडुनवघर, खारबाव, मालोडी, पाये, पायगाव.
कूळ शेतकऱ्यांना ९० टक्के मोबदला
विरार-अलिबाग कॉरिडॉरमध्ये भूदान समितीच्या नावे नोंद असलेल्या, पण वर्षानुवर्षे शेतकऱ्यांच्या ताब्यात असलेल्या जमिनीच्या मोबदल्यावरून वाद होता. भूदान कायद्यानुसार पूर्वी जमीनधारक शेतकऱ्याला ६० टक्के आणि राज्य सरकारला ४० टक्के मोबदला मिळत होता. मंत्रालयातील बैठकीत शेतकऱ्यांची मागणी मान्य करत महसूलमंत्र्यांनी कूळ शेतकऱ्यांना ९० टक्के मोबदला आणि राज्य सरकारला १० टक्के मोबदला देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बुधवारी (ता. २९) मंत्रालयात महसूलमंत्री बावनकुळे यांनी घेतलेल्या या विशेष बैठकीला कपिल पाटील, देवेश पाटील, सुधाकर म्हात्रे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. या निर्णयामुळे भिवंडीतील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.