Crop Insurance Scheme: पिक विमा योजनेअंतर्गत मिळाली तुटपुंजी रक्कम; काेणाला ५ तर काहींना २१ रुपये, शेतकऱ्यांचे निवेदन
esakal November 01, 2025 04:45 AM

अकोला : प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात आलेले पैसे हे शेतकऱ्यांची आर्थिक थट्टा करणारी आहेत असा आराेप करीत शेतकऱ्यांनी पैसे धनादेशाद्वारे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना परत केले.

तुटपुंजी मदत म्हणजे शेतकऱ्यांचा अपमान करणारी आहे, अशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. काेणाच्या खात्यात ५ तर काेणाला २१ रुपये मिळाल्याने शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनीच्या कारभारावर ताशेरे सुद्धा ओढले.

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतमालाचे उत्पादन प्रचंड घटते. पीक विमा याेजनेच्या माध्यमातून तरी नुकसान भरपाई मिळावी, अशी अपेक्षा असते. यासाठीचा प्रिमियम म्हणून शेतकरी आणि केंद्र- राज्य सरकार हा हिस्सा भरते. मात्र अनेकदा अत्यल्प माेबदला मिळताे. अनेकांना तर माेबदलाच मिळत नाही.

दरम्यान पीक विमा याेजनेअंर्तगत शेतकऱ्यांच्या खात्यात अत्यल्प अर्थात नसल्यासारखेच पैसे जमा झाले. कॉंग्रेसचे कपिल ढोके यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन हे पैसे परत केले आहेत.

यावेळी उपस्थित शेतकऱ्यांमध्ये आदित्य विलास मुरकुटे, उमेश काशीराम कराड, अविनाश विश्वंभर नागरे, रोहित वखारे, नंदकिशोर मोडक, सुधाकर दामोदर, देविदास गावंडे, निलेश वाकोडे, मनोज पाचबोले, रघुनाथ कोल्हे, केशव केंद्रे, यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Premium| Maharashtra Crop Damage: कर्जमाफी आणि हेक्टरी ५० हजार रुपये मदत मिळाल्याशिवाय शेतकरी रब्बीची पेरणी कशी करतील? शेतकऱ्यांची थट्टा

कुटासा परिसरातील दिनोडा, मरोडा, कावसा व रेल या परिसरातील शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई पोटी कुणाच्या खात्यात पाच रुपये, आठ रुपये, तेरा रुपये १४ रुपये २१ रुपये अशा पद्धतीची आलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा करणारी आहे. या मदतीमध्ये एक पाव साखर सुद्धा मिळू शकत नाही अशी मदत पाठवून सरकार शेतकऱ्यांचा अपमान करत आहे अशी भावना या शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.