 
            आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत आणि कुटनीती तज्ज्ञ तर होतेच मात्र सोबतच ते एक प्रख्यात अर्थतज्ज्ञ देखील होते. व्यक्तीच्या आयुष्यात पैशांचं काय स्थान असतं? पैशांचं नियोजन कसं करावं? पैसा कुठे खर्च करावा? जर अनावश्यक ठिकाणी पैसा खर्च होत असेल तर काय करावं? अशा एक ना अनेक गोष्टी आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात व्यक्तीच्या आयुष्यात पैसा ही एक अशी गोष्ट आहे, की तुमच्या आयुष्यात कोणतंही संकट आलं तर तुम्ही पैशांच्या जोरावर त्यामधून मार्ग काढू शकता. त्याही पुढे जाऊन चाणक्य असंही सांगतात की जर तुमच्याकडे पैसा असेल तर तुमच्यावर येणारे अनेक संकट येण्यापूर्वीच नष्ट होतात, त्यामुळे माणसाने आपल्या आयुष्यात पैशांची बचत केली पाहिजे असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे. माणसाने आपल्या आयुष्यात पैसा कमावला पाहिजे, मात्र तो योग्य मार्गाने कमावला पाहिजे, काळं धन किंवा कोणाची फसवणूक करून कमावलेला पैसा जास्त दिवस टिकत नाही, असंही चाणक्य यांनी म्हटलं आहे, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे त्याबद्दल?
पैसा माणसाचा मित्र कधी बनतो? आर्य चाणक्य म्हणतात जेव्हा तुम्ही कमावलेला पैसा हा तुमच्या मुलांचं चांगलं संगोपन, शिक्षण, आणि त्यांना उत्तम प्रकारचा रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी खर्च होतो, किंवा तुम्ही आजारी आहात आणि तुमच्या आजारावर उपचार करण्यासाठी असा पैसा खर्च झाला तर तो पैसा तुमचा मित्र बनतो. कारण तुम्ही तुमच्या मुलांना उत्तम शिक्षण देण्यासाठी पैसा खर्च करता, त्याच शिक्षणाच्या जोरावर त्यांना चांगला रोजगार मिळतो आणि वृद्धपणामध्ये ते तुमचा सांभाळ करतात, म्हणून अशा गोष्टींमध्ये खर्च झालेला पैसा हा तुमचा मित्र असतो.
पैसा माणसाचा शत्रू कधी बनतो? चाणक्य म्हणतात जर तुमच्याजवळ असलेला पैसा तुम्ही जुगार, व्यसन आणि इतर वाईट गोष्टींवर खर्च केला, पैशांची कारण नसताना उधळपट्टी केली तर तो तुमचा शत्रू बनतो, कारण त्यानंतर वृद्धापकाळात तुमच्याकडे पैसा शिल्लक राहत नाही, अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
वाईट मार्गानं कमावलेला पैसा किती दिवस टिकतो? चाणक्य म्हणतात की माणसाने मेहनत करूनच पैसा कमावला पाहिजे, कष्टाचा पैसा चिरकाल टिकतो. मात्र जर तुम्ही कोणाची फसवणूक करून पैसे कमावले असतील तर असं धन किंवा पैसा फक्त दहा वर्ष तुमच्या हातात टिकतो, 11 व्या वर्षी तो नष्ट होतो, त्यामुळे कष्ट करून पैसे कमवा असा सल्ला चाणक्य देतात.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)