सोलापूर : व्यावसायिक व आर्थिक वादातून पिंपरीचे (ता. मोहोळ) तत्कालीन सरपंच चंद्रकांत गुलाब बंडगर यांचे फेब्रुवारी २००९ मध्ये तिघांनी अपहरण केले होते. या गुन्ह्यात मोहोळ पोलिसांनी दुर्योधन तुळशीराम बंडगर, नागनाथ बन्ने, हिरेमठ स्वामी यांना अटक केली. चंद्रकांत यांचे अपहरण केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे नमूद करून पुणे ‘सीआयडी’ पथकाने संशयितांविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. परंतु, बेपत्ता चंद्रकांत बंडगर यांचे काय झाले?, ते कोठे गेले याबद्दल त्यात काही नमूद नव्हते. फिर्यादीच्या अर्जावरून आता जिल्हा सत्र न्यायाधीश जयदीप मोहिते यांनी मोहोळ पोलिसांना गुन्ह्याचा सविस्तर तपास करण्याचा दिला आहे.
चंद्रकांत बंडगर हे २० फेब्रुवारी २००९ रोजी अचानक बेपत्ता झाले. त्याबद्दल बिभीषण बंडगर यांनी मोहोळ पोलिसांत तक्रार दिली होती. २५ फेब्रुवारी २००९ रोजी तिघांनी चंद्रकांतचे अपहरण करून घातपात केल्याचे फिर्यादीने मोहोळ पोलिसांना सांगितले. त्यानुसार तिघांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी संशयितांना अटक केली. गुन्ह्याचे गांभीर्य पाहता ९ ऑगस्ट २०११ रोजी गुन्हा पुणे ‘सीआयडी’कडे सोपविण्यात आला. चंद्रकांत यांचे अपहरण संशयितांनीच केल्याचे निष्पन्न झाल्याचे नमूद करुन ‘सीआयडी’ने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. परंतु, चंद्रकांतचे पुढे काय झाले, त्यांचा घातपात झाला की काय?, याबाबत कोणताच तपास दोषारोपपत्रात दिसत नाही. त्यामुळे व्यथित होऊन फिर्यादीने केलेला अर्ज मोहोळ न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर फिर्यादीने अॅड. प्रशांत नवगिरे यांच्यामार्फत सत्र न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल केली. अर्जाच्या सुनावणीवेळी चंद्रकांत १५ वर्षांपासून सापडत नसल्यामुळे त्यांचा घातपात झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच अपहरणापूर्वी चंद्रकांत हे राजाराम दुधाळ यांच्याबरोबर गेले होते. तरीदेखील दुधाळबाबत कोणताही तपास झालेला दिसत नाही. तपासाच्या अनुषंगाने संशयितांचे व दुधाळचे सीडीआर, टॉवर लोकेशन घेऊन इतरांकडे तपास होणे गरजेचे आहे. त्याशिवाय गुन्ह्यातील वस्तुस्थिती न्यायालयासमोर येणार नाही व फिर्यादीस न्याय मिळणार नाही’ असा युक्तिवाद ॲड. नवगिरे यांनी केला. त्यानंतर जिल्हा सत्र न्यायाधिशांनी युक्तिवाद ग्राह्य मानून मोहोळ पोलिसांना आदेश दिला. यात फिर्यादीतर्फे अॅड. नवगिरे, अॅड, सिद्धाराम पाटील, अॅड, चेतन रणदिवे यांनी तर सरकारतर्फे अॅड. दत्तूसिंग पवार यांनी काम पहिले.
न्यायालयाचे निरीक्षण अन् पोलिसांना आदेश
‘तपासकामी चंद्रकांत हे जिवंत अथवा मृत सापडले नाहीत. पोलिसांनी अर्धवट व सदसद्विवेक बुद्धीस न पटणारे दोषारोपपत्र दाखल केले आहे. यात सविस्तर तपास होणे गरजेचे आहे’ असे मत न्यायालयाने नोंदविले. तसेच या प्रकरणात अधिकचा तपास करण्यात यावा, असा आदेश मोहोळ पोलिसांना दिला, असे ॲड. नवगिरे यांनी सांगितले.