आई-मुलगा आणि आई-मुलगी या नात्याची तुलना कोणत्याच नात्याबरोबर होऊ शकत नाही. या नात्यामध्ये कधी कधी संकटे आली किंवा एखादा मोठा प्रसंग उभा राहिला तरी नात्यातील गोडवा आणि आपुलकी कधी कमी होत नाही. आई आणि मुलगा यांच्या नात्यातील जिव्हाळा, आपुलकी आणि प्रेम कधी कमी होत नसतं. आता प्रदर्शित झालेला दिग्दर्शक शंकर धुलगुडे यांचा 'वेल डन आई' हा चित्रपट आई आणि मुलाच्या भावविश्वावर बेतलेला आहे. आई आणि मुलाच्या नात्याची सुंदर अशी माळ या गुंफण्यात आली आहे. ही नात्याची माळ गुंफताना कौटुंबिक नातेसंबंध, त्यातील हेवेदावे, रुसवेफुगवे, मानापमान वगैरे बाबी दिग्दर्शकाने उत्तमरीत्या टिपलेल्या आहेत. आपली संस्कृती आणि आपले नातेसंबंध दर्शविताना आपण कसं जगतो यापेक्षा आपण कसं वागतो हेदेखील दिग्दर्शकाने या चित्रपटातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
या चित्रपटाची कथा एका चाळीमध्ये घडणारी आहे. शांताराम माने (विजय निकम) शकुंतला माने (विशाखा सुभेदार) हे पती-पत्नी असतात. त्यांच्या मुलाचे नाव दीपक (आयुष पाटील) असे असते. आता दीपक वयामध्ये आल्यामुळे साहजिकच त्याचे लग्न व्हावे, अशी त्याच्या आईची इच्छा असते आणि दीपकलाही आपले लग्न व्हावे असे वाटत असते. परंतु वडिलांच्या हेकेखोर स्वभावामुळे नेहमीच अडथळे येत असतात. त्यामुळे शकुंतलासमोर मोठे आव्हान उभे राहते. दरम्यान शकुंतलाचा भाऊ सदानंद वाघमारे (जयवंत वाडकर) यालाही ज्योती (सिमरन खेडकर)नावाची एक मुलगी असते. तिच्यासाठीदेखील चांगला वर मिळावा याचा शोध सदानंद घेत असतो. अशातच एके दिवशी दीपकच्या मनामध्ये ज्योतीचा विचार येतो. ज्योतीबरोबरच आपण लग्न केले तर, असा विचार तो करतो आणि आपला हा विचार आपल्या आईकडे तो व्यक्त करतो.
त्याच्या आईलादेखील दीपक आणि ज्योती यांचे लग्न व्हावे असे वाटत असते. परंतु येथेही मोठा अडथळा असतो शांताराम माने यांचा. कारण शांताराम आणि सदानंद यांच्यामध्ये कमालीचे वैर असते. त्यामुळे सदानंद गेली कित्येक वर्षे त्यांच्या घरी आलेला नसतो. मग नेमके काय होते? दीपक आणि ज्योतीचे लग्न होते का? शकुंतला यामध्ये कोणती भूमिका बजावतो? नकारात्मक वाटणारा शांताराम त्यानंतर सकारात्मक विचार करतो का? आदी प्रश्नांची उत्तरे या चित्रपटामध्ये आहेत. दिग्दर्शक शंकर धुलगुडे आणि निर्माते सुधीर पाटील यांनी हा एक कौटुंबिक चित्रपट आणलेला आहे. नात्या-नात्यामध्ये कितीही कडवटपणा आला किंवा मतभेद झाले तरी नाते टिकविणे... नात्यातील गोडवा जपणे किती महत्त्वाचे आहे, हे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
नात्यांमधील राग, लोभ, रुसवेफुगवे, हेवेदावे या सगळ्या बाबींची बांधणी दिग्दर्शकाने उत्तम केली आहे. कथेचा गाभा जरी छोटा असला तरी पटकथेची उत्तम साथ लाभली आहे. ही कथा कधी भावनिक तर कधी विनोदी अंगाने हळूहळू पुढे सरकणारी आहे. अभिनेत्री विशाखा सुभेदार, विजय निकम, जयवंत वाडकर, आयुष पाटील, सिमरन खेडकर, बीना सिद्धार्थ, तन्वी धुरी आणि विपुल खंडाळे या सगळ्याच कलाकारांनी आपापल्या भूमिका चोख केल्या आहेत. हेकेखोर आणि हट्टी अशा शांताराम मानेची व्यक्तिरेखा विजय निकम यांनी उत्तमरीत्या पेलली आहे. शकुंतला मानेच्या भूमिकेचे बेअरिंग विशाखाने छान पकडले आहे. आपल्या संसारासाठी कष्ट करणारी, मुलाच्या लग्नासाठी धडपडणारी हळवी आणि भावनिक अशी ही भूमिका विशाखाने समरसून साकारली आहे. आयुष पाटीलनेदेखील दीपकची भूमिका उत्तम वठविली आहे. एकीकडे त्याच्या आईचा लग्नासाठी चाललेला आटापिटा आणि दुसरीकडे वडिलांचा सततचा अडथळा अशा चक्रव्यूहामध्ये सापडलेल्या दीपकची होणारी घालमेल त्याने पडद्यावर उत्तम सादर केली आहे.
गीतकार संदीप गचांडे यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार निशाद गोलांबरे यांनी सुंदर संगीतसाज चढवला आहे. कथेच्या अनुषंगाने ही गाणी पेरण्यात आली आहेत. ॲग्नेल रोमन यांनी या चित्रपटाला पार्श्वसंगीत दिले आहे. निलेश गावंड यांच्या उत्तम संकलनाची जोड या चित्रपटाला लाभली आहे. मात्र चित्रपटाचा पूर्वार्ध काहीसा संथ झाला आहे. मध्यंतरापूर्वी कथा फारशी पुढे सरकत नाही. त्यानंतर कथानक वेगाने पुढे सरकते आणि नाट्यमय घडामोडींनी चित्रपट संपतो. एकूणच सांगायचे झाले तर आई-मुलाच्या भावनिक नात्याची ही कथा आहे. आई व मुलाच्या नात्याची सुंदर गुंफण करण्यात आली आहे.
लग्नाच्या शुटिंगनंतर 'वीण ही दोघांतली तुटेना' मालिका सोडणार तेजश्री प्रधान? व्हिडिओ शेअर करत दिली अपडेट