भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिल्यांदाच विश्वचषक जिंकून इतिहास रचला. रविवारी (2 नोव्हेंबर 2025) नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर रंगलेल्या फायनलमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव करत सामना जिंकला आणि एकच जल्लोष झाला. महिला संघाने वर्ल्डकप ट्रॉफीवर नव कोरताच सर्वांचा ऊर अभिमानाने भरून आला. मात्र या सामन्यानंतर, शानदार विजयाच्या पार्श्वभूमीवर फक्त भारतातूनच नव्हे तर शेजारचा देश, पाकिस्तानमधूनही प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.
पाकिस्तानेच माजी खेळाडू आणि माजी कर्णधार रमीझ राजाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यांनी भारतीय संघावर स्तुतीसुमनं उधळली. ” ते इतके उत्तम संघ का आहेत हे भारताने पुन्हा एकदा दाखवून दिलं, त्यांचे संघटन भक्कम आहे. त्यांची कामगिरी भक्कम आहे. ते निश्चिंत राहिले. ही निराशाजनक परिस्थिती नव्हती. यावरून भारताबद्दल एक उत्तम गोष्ट दिसून येते. ते एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेतात आणि त्याचे परिणाम तुमच्या समोर दिसतात. तुम्ही क्रिकेट का खेळता हे विसरू नका, कोणत्याही तरूण खेळाडूसाठी हा एक धडा आहे. आपण सर्वजण क्रिकेट खेळतो कारण आपलं त्यावर प्रेम आहे, आपण तो खेळ एन्जॉय करतो ” असं त्यांनी म्हटलं.
शोएब अख्तरची प्रतिक्रिया समोर
एवढंच नव्हे तर भारतीय महिला संघाच्या विजयावर पाकिस्तानाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनेही भाष्य केलं. “भारताच्या विजयाबद्दल अभिनंदन. भारतीय मुलींनी चांगला खेळ केला आणि खरोखरच त्या विजयासाठी पात्र होत्या. त्यांनी सर्वांना सेलिब्रिशेनचं साजरा करण्याचे कारण दिले. टीम इंडियाची गोलंदाजी आणि फलंदाजी देखील खूप चांगली होती. त्यामुळे मैदानात संपूर्ण ॲटिट्यूडने उतरले, वावरले. ” असे ते म्हणाले. “टीम इंडियाने व्यापक विजय मिळवला याचा मला आनंद आहे. त्यांनी खूप व्यावसायिकता दाखवली आहे. त्यांनी स्वतःमध्ये खूप बदल केले आहेत ” असंही त्यांनी पुढे नमूद केलं.
52 वर्षांचा दुष्काळ संपला
शफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा यांच्या अष्टपैलू कामगिरीमुळे भारताने वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी हरवून पहिल्यांदाच महिला आयसीसी वनडे वर्ल्डकप जिंकून इतिहास रचला. डावाची सुरुवात करताना शफालीने 78 चेंडूत 87 धावांची आक्रमक खेळी केली. यानंतर, दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी सुरू असताना तिने तिच्या फिरकी गोलंदाजीने अनुभवी फलंदाज सून लुस आणि मॅरिझाने कॅप यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला, ज्यांनी फक्त 4 धावा केल्या. मधल्या षटकांमध्ये विकेट्स पडताना 58 चेंडूत 58 धावांचे योगदान देणाऱ्या भारताच्या दीप्तीने पाच विकेट्स घेत सामना फिरवला. तिने दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड (101) हिचाही बळी टिपला.
रविवारी झालेल्या फायनलमध्ये भारताने प्रथम फलंदाजी करताना 7 विकेट गमावून 298 धावा केल्या. त्या आव्हानाचा सामन करणाऱ्या दक्षि आफ्रिकेच्या संघाला त्यांनी 246 धावांवर रोखत 52 धावांनी विजय मिळवला आणि 52 वर्षांचा दुष्काळ संपवत वर्ल्डकप ट्रॉफीवर नाव कोरलं.