Womens World Cup 2025 : वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणारे 6 फलंदाज, नंबर 1 कोण?
Tv9 Marathi November 04, 2025 09:45 AM

भारतीय महिला संघाने 52 वर्षांची प्रतिक्षा संपवत तिसऱ्या प्रयत्नात वर्ल्ड कप जिंकला. भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं. भारतीय महिला संघाने हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात तर अमोल मुझुमदार यांच्या मार्गदर्शनात ही कामगिरी केली. भारताच्या विजयात सर्वच खेळाडूंनी योगदान दिलं. स्मृती मंधाना, जेमीमा रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर, प्रतिका रावल, शफाली वर्मा यांनी बॅटिंगने योगदान दिलं. श्री चरणी, अरुंधती रेड्डी, रेणूका सिंग ठाकुर आणि इतरांनी बॉलिंगने कमाल केली. तर दीप्ती शर्मा आणि अमनजोत कौर या दोघींनी बॅटिंग आणि बॉलिंगने ऑलराउंड कामगिरी केली. या निमित्ताने या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या 6 फलंदाजांबाबत आपण जाणून घेऊयात. सर्वाधिक धावा करणाऱ्या 6 फलंदाजांमध्ये 3 भारतीय आहेत. ऑस्ट्रेलियाच्या 2 तर उपविजेत्या दक्षिण आफ्रिकेची 1 फलंदाज आहे.

जेमीमा रॉड्रिग्स स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी एकूण सहावी तर टीम इंडियाची तिसरी फलंदाज ठरली. जेमीने 8 सामन्यांमधील 7 डावात 292 धावा केल्या. तसेच जेमीने एकमेव मात्र महत्त्वपूर्ण शतक उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध झळकावलं. जेमीने तेव्हा 127 धावांची खेळी केली होती.

फोएबी लिचफिल्ड

ऑस्ट्रेलियाची युवा सलामीवीर फोएबी लिचफिल्ड या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.लिचफिल्डने 7 सामन्यांमध्ये 1 शतक आणि 1 अर्धशतकासह 304 धावा केल्या.

प्रतिका रावल

प्रतिका रावलला दुखापतीमुळे साखळी फेरीनंतरच्या सामन्यांना मुकावं लागलं. प्रतिकाने 7 सामन्यांमधील 6 डावात 1 शतक आणि 1 अर्धशतकासह 308 रन्स केल्या.

एश्ले गार्डनर

ऑस्ट्रेलियाची एश्ले गार्डनर या यादीत तिसर्‍या स्थानी आहे. गार्डनरने 7 सामन्यांमधील 5 डावांत 328 धावा केल्या. गार्डनरने या स्पर्धेत 2 शतकं आणि 1 अर्धशतक लगावलं होतं.

स्मृती मंधाना

उपकर्णधार आणि सांगलीकर स्मृती मंधाना या स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक धावा करणार पहिली आणि एकूण दुसरी फलंदाज ठरली. स्मृतीने 9 सामन्यांमध्ये 434 धावा केल्या. स्मृतीने या स्पर्धेत 1 शतक आणि 2 अर्धशतक लगावले.

लॉरा वोल्वार्ड्ट

दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड्ट हीने या स्पर्धेत सर्वाधिक 2 शतकं आणि 3 अर्धशतकं झळकावली. लॉरा या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली. लॉराने 9 सामन्यांमध्ये 571 धावा केल्या.

सर्वाधिक विकेट्स कुणाच्या नावावर?

तसेच वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स या टीम इंडियाच्या दीप्ती शर्मा हीने घेतल्या. दीप्तीने 9 सामन्यांमध्ये सर्वाधिक 22 विकेट्स मिळवल्या. तसेच टॉप 5 मध्ये दीप्ती व्यतिरिक्त श्री चरणी आहे. श्री चरणी चौथ्या स्थानी आहे. श्री ने 9 सामन्यांमध्ये 14 विकेट्स मिळवल्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.