वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण अफ्रिकेला पराभूत करत जेतेपद मिळवलं. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात टीम इंडियाने जेतेपदाला गवसणी घातली. भारताने दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी 298 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण दक्षिण अफ्रिकन संघ 246 धावांपर्यंत मजल मारू शकला. हा सामना भारताने 52 धावांनी जिंकला आणि जेतेपद पहिल्यांदा मिळवलं. या विजयानंतर टीम इंडियाने वर्ल्डकपची ट्रॉफी हातात घेत ती उंचावली. पण आयसीसीच्या नियमानुसार ही ट्रॉफी भारताकडून परत घेतली जाणार आहे. आयसीसी स्पर्धा जिंकणार्या कोणत्याही संघाला खरी ट्रॉफी दिली जात नाही. त्याऐवजी संघाला त्या ट्रॉफीची प्रतिकृती दिली आहे. खरी ट्रॉफी फक्त बक्षीस समारंभापर्यंत विजयी संघाच्या हातात असते. त्यानंतर ती ट्रॉफी पुन्हा आयसीसीकडे सुपूर्द केली जाते.
ट्रॉफीबाबत आयसीसीचा नियमआयसीसीने 26 वर्षापूर्वी ट्रॉफीबाबत नियम केला आहे. त्यामुळे विजयी संघाला ट्रॉफी दिली जाते आणि फोटो सेशन आणि विक्ट्री परेडसाठी वापरली जाते. पण हे सर्व झाल्यानंतर ही ट्रॉफी पुन्हा आयसीसीला सुपूर्द करावी लागते. यानंतर आयसीसी विजेत्या संघाला त्या ट्रॉफीची प्रतिकृती देते. ती ट्रॉफी अगदी हुबेहूब तशीच्या तशीच असते. यात सोनं आणि चांदीचा वापर केला जातो. खरी ट्रॉफी आयसीसीच्या दुबई मुख्यालयात ठेवली जाते. ही ट्रॉफी चोरी किंवा त्याचं नुकसान होऊ नये यासाठी असं केलं जातं.
महिला वनडे वर्ल्डकप ट्रॉफीची खासियतमहिला वर्ल्डकप स्पर्धेच्या ट्रॉफीबाबत सांगायचं तर त्याचं वजन 11 किलो आहे. तसेच त्याची उंची जवळपास 60 सेंटीमीटर आहे. ही ट्रॉफी सोनं आणि चांदीपासून तयार केलेली आहे. यात तीन कॉलम चांदीचे असून त्याला स्टंप आणि बेल्सचा आकार आहे. तसेच टॉपला सोन्याचा गोलाकार ग्लोब आहे. यावर आतापर्यंत ट्रॉफी जिंकलेल्या स्पर्धेकांची नावं कोरली आहेत. यात आता भारताचं पहिल्यांदा नाव कोरलं गेलं आहे. महिला वनडे वर्ल्डकप स्पर्धेची 13 पर्व पार पडली आहेत. यात ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक 7 वेळा, इंग्लंडने 4 वेळा, तर न्यूझीलंड आणि भारताने एक वेळा जेतेपद मिळवलं आहे.