14 वर्षीय वैभव सूर्यवंशीची इंडिया ए संघात निवड, जितेश शर्माच्या नेतृत्वात खेळणार आशिया कप
GH News November 04, 2025 10:16 PM

रायझिंग स्टार्स आशिया कप स्पर्धेचं बिगुल वाजलं आहे. ही स्पर्धा 14 नोव्हेंबरला सुरु होणार असून यासाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी इंडिया ए संघात वैभव सूर्यवंशीची निवड झाली आहे. टीम इंडिया ए संघाच्या 15 खेळाडूंच्या नावाची घोषणा झाली तेव्हा त्यात 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीचं नाव होतं. वैभव सूर्यवंशीने व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये गेल्या काही महिन्यात झालेल्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळेच त्याची संघात निवड केली आहे. टीम इंडियात स्थान मिळवण्याच्या दृष्टीने वैभव सूर्यवंशीसाठी ही खूप मोठी संधी आहे. कारण या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली तर टीम इंडियाचं दार त्याच्यासाठी लवकर खुलं होण्याची शक्यता आहे. वैभव सूर्यवंशी एका पाठोपाठ एक संधी मिळवत आहे. तसेच त्या संधीचं सोनंही करत आहे. रायझिंग स्टार्स आशिया कप स्पर्धा यापूर्वी इमर्जिंग आशिया कप स्पर्धेने ओळखली जात होती. भारताच्या गटात पाकिस्तानचा संघ आहे. त्यामुळे या स्पर्धेत भारता पाकिस्तान सामनाही पाहायला मिळणार आहे. खासकरून हायव्होल्टेज सामन्यात वैभव सूर्यवंशीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

रायझिंग स्टार्स आशिया कपमध्ये इंडिया ए संघाला ओमान, यूएई आणि पाकिस्तान ए संघांसह गट ब मध्ये स्थान देण्यात आले आहे. स्पर्धेतील सर्व सामने दोहा येथे खेळवले जातील. दुसरीकडे, वैभव सूर्यवंशी टीम इंडियात कधी खेळणार? असा प्रश्न अनेक जण विचारत आहेत. कारण त्याने व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याचं उत्तर संघातील दिग्गज खेळाडूंनी आधीच दिलेलं आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनच्या मते वैभव सूर्यवंशी पुढच्या एक दोन वर्षात टीम इंडियासाठी खेळू शकतो. असंच काहीसं म्हणणं वैभव सूर्यवंशीचे प्रशिक्षक मनीष ओझा यांचं देखील आहे. संजू सॅमसन आणि त्याच्या प्रशिक्षकांचं म्हणणं ऐकता येत्या काही वर्षात हे खरंही होईल. कारण वैभव सूर्यवंशी कमी वयात अनेक विक्रम आपल्या नावावर करत आहे. त्यामुळे टीम इंडियातील संधी फार दूर नाही. आता फक्त त्याला या स्पर्धेत चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

रायझिंग स्टार्स आशिया कप स्पर्धेसाठी इंडिया ए संघ : जितेश शर्मा (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, नेहाल वढेरा, प्रियांश आर्या, आशुतोष शर्मा, नमन धीर, सूर्यांश शेडगे, रमनदीप सिंह, युद्धवीर सिंह चरक, यश ठाकुर, गुरजनप्रीत सिंह, विजय कुमार व्यस्क, हर्ष दुबे, अभिषेक पोरेल, सुयश शर्मा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.