वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेनंतर हरमनप्रीत कौरला आयसीसीकडून धक्का, या खेळाडूला मिळालं कर्णधारपद
Tv9 Marathi November 05, 2025 01:45 AM

Womens World Cup 2025 Team of the Tournament: वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने दक्षिण अफ्रिकेचा धुव्वा उडवला आणि जेतेपदावर नाव कोरलं. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात टीम इंडियाने ही कामगिरी केली. पण असं असताना हरमनप्रीत कौरला धक्का बसला आहे. टीम इंडियाला पहिल्यांदा चॅम्पियन बनवणाऱ्या हरमनप्रीत कौरला आयसीसीने कर्णधारपद नाकारलं. कर्णधारपद सोडा तिला संघातही स्थान दिलेलं नाही. त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे. आयसीसीने मंगळवारी वुमन्स वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेतील बेस्ट प्लेइंग 11 ची घोषणा केली. या संघाचं कर्णधारपद दक्षिण अफ्रिकेच्या लॉरा वॉल्वार्डला देण्यात आलं आहे. लॉरा वॉल्वार्डच्या नेतृत्वात दक्षिण अफ्रिकेने अंतिम फेरी गाठली होती. इतकंच काय तर भारताने विजयासाठी दिलेल्या धावांचा पाठलाग करताना झुंजार खेळीही केली होती. पण संघाला विजयाच्या वेशीपर्यंत पोहोचू शकली नाही. अंतिम फेरीत तिचं शतकही हुकलं पण स्पर्धेतील तिची कामगिरी खरंच उल्लेखनीय होती.

आयसीसीच्या बेस्ट प्लेइंग 11 मध्ये तीन भारतीय

आयसीसीने जाहीर केलेल्या बेस्ट प्लेइंग 11 मध्ये भारताच्या तीन खेळाडूंना संधी मिळाली आहे. यात ओपनर स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्स आणि प्लेयर ऑफ द टूर्नामेंट असलेल्या दीप्ती शर्माला स्थान मिळालं आहे. तर दक्षिण अफ्रिकेचे तीन खेळाडू प्लेइंग 11 मध्ये आहेत. यात कर्णधार लॉरा वॉल्वार्ड, नादिन डी क्लार्क आणि मारिझेन कॅपचं नाव आहे. ऑस्ट्रेलियाच्या अष्टपैलू एश गार्डनर, एनाबेल सदरलँड आणि फिरकीपटू एलाना किंगला संघात स्थान मिळालं आहे. तर इंग्लंडच्या सोफी एक्सलस्टोन आणि पाकिस्तानची विकेटकीपर सिदरा नवाजला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालं आहे. सिदरा नवाजने 4 झेल आणि 4 यष्टीचीत केले होते. त्यामुळे तिला संघात स्थान मिळालं आहे.

हरमनप्रीत कौरला का डावललं?

टीम इंडियाला हरमनप्रीत कौरच्या मैदानातील निर्णयाचा फायदा झाला. त्यामुळेच जेतेपद मिळवता आलं. अंतिम फेरीत शफाली वर्माला गोलंदाजी देणं हा तिचा निर्णय सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. पण असं असूनही हरमनप्रीत कौरल इतर खेळाडूंच्या तुलनेत फलंदाजीत हवं तसं योगदान देऊ शकली नही. हरमनप्रीत कौरने 8 डावात 32.50 च्या सरासरीने 260 धावा केल्या. यात तिने दोन अर्धशतकं ठोकली. दुसरीकडे, ऋचा घोषलाही या संघात स्थान मिळालं नाही. कारण तिने 8 डावात फक्त 113 धावा केल्या. पण या धावा तिने 235 हून अधिकच्या स्ट्राईक रेटने ठोकल्या होत्या. तसेच चार झेलही घेतले होते.

आयसीसीने निवडलेली बेस्ट प्लेइंग 11 : स्मृती मंधाना, लॉरा वॉल्वार्ड, जेमिमा रॉड्रिग्स, मॅरिझेन कॅप, एश गार्डनर, दीप्ती शर्मा, एनाबेल सदरलँड, नादिन डी क्लार्क, सिदरा नवाज, एलाना किंग आणि सोफी एक्सल्टोन.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.