शहराचे पहिले भारतीय-अमेरिकन मुस्लीम महापौर
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
भारतीय वंशाचे डेमोक्रॅटिक उमेदवार जोहरान ममदानी यांनी न्यूयॉर्कच्या महापौरपदाच्या निवडणुकीत 50.4 टक्के मते मिळवून विजय मिळवला आहे. ते ‘मान्सून वेडिंग’ आणि ‘सलाम बॉम्बे’ या चित्रपटांच्या दिग्दर्शिका मीरा नायर यांचे पुत्र आहेत. ममदानी हे गेल्या 100 वर्षात न्यूयॉर्कचे सर्वात तरुण, पहिले भारतीय-अमेरिकन आणि पहिले मुस्लीम महापौर ठरले आहेत. आपल्या विजयी भाषणात त्यांनी 15 ऑगस्ट 1947 रोजी मध्यरात्री दिलेल्या जवाहरलाल नेहरूंच्या ‘ट्रिस्ट विथ डेस्टिनी’ भाषणाचा संदर्भ दिला. भाषणानंतर, ते आपल्या पत्नीसोबत ‘धूम मचाले’ गाण्यावर नाचताना दिसले. तसेच त्यांची आई मीरा नायर स्टेजवर आल्यावर त्यांनी आईला मिठी मारली. याप्रसंगी त्यांचे वडील महमूद ममदानी हेदेखील उपस्थित होते.
जोहरान ममदानी यांनी डेमोक्रॅटिक प्रायमरीमध्ये 67 वर्षीय माजी गव्हर्नर अँड्य्रू कुओमो यांचा पराभव केला. ही निवडणूक केवळ न्यूयॉर्कच्या महापौरपदासाठी नव्हती, तर डेमोक्रॅटिक पक्षातील वैचारिक आणि पिढीजात संघर्षाची एक मोठी परीक्षा होती. या निवडणुकीत ममदानी यांनी 9,48,202 मते (50.6 टक्के) मिळवून एनवायसीच्या महापौरपदाची निवडणूक जिंकली. कुओमो स्वतंत्र उमेदवार म्हणून उभे राहिले आणि त्यांना ट्रम्पचा पाठिंबा होता. कुओमो यांना 7,76,547 मते (41.3 टक्के) मिळाली, तर स्लिवा यांना 1,37,030 मते मिळाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी लोकांना जोहरान ममदानी यांना मतदान करू नये असे आवाहन केले होते. त्यांनी न्यूयॉर्कचे माजी गव्हर्नर कुओमो यांना पाठिंबा दिला होता.
व्हर्जिनिया, न्यू जर्सीमध्येही डेमोक्रॅट्सचा विजय
डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार अबीगेल स्पॅनबर्गर यांनी व्हर्जिनियामध्येही विजय मिळवला. आता त्या राज्याच्या नवीन गव्हर्नर होणार असून राज्याच्या पहिल्या महिला गव्हर्नर ठरतील. तसेच गझाला हाश्मी लेफ्टनंट गव्हर्नर बनतील. रिपब्लिकन लेफ्टनंट गव्हर्नर विन्सम अर्ल-सीयर्स यांना पराभूत करून त्यांनी मध्यमवर्गीय डेमोक्रॅट अजूनही मतदारांचा विश्वास जिंकू शकतात असा स्पष्ट संदेश दिला. डेमोक्रॅट मिकी शेरिल यांनी न्यू जर्सीमध्ये गव्हर्नरपदही जिंकले.