क्रिकेट सामने पाहण्यासाठी चाहत्यांना मोठी रक्कम खर्च करून तिकीट घ्यावे लागते. स्टेडियममध्ये ते फक्त मॅचचा आनंद घेऊ शकतात. पिण्याचे पाणी सोडले, तर ते कोणतीही वस्तू घरी घेऊन जाऊ शकत नाहीत. मात्र आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने चाहत्यांसाठी एक अनोखा आणि आकर्षक नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नियमामुळे चाहत्याला तब्बल 20 हजार रुपये किंमतीची बॉल मोफत घरी नेण्याची संधी मिळणार आहे.
बिग बॅश लीग (BBL) आणि महिला बिग बॅश लीग (WBBL) च्या आगामी हंगामासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केले की जर एखाद्या सामन्यातील पहिल्या ओव्हरमध्ये चेंडू स्टँडमध्ये गेला आणि तो फॅनने पकडला किंवा चेंडू त्याच्याकडे आला, तर तो चेंडू परत करण्याची गरज नाही. तो फॅन ती बॉल स्वतःसोबत घरी घेऊन जाऊ शकतो.
पूर्वीचा नियम असा होता की चेंडू स्टँडमध्ये गेला तरी प्रेक्षकांनी तो परत करणे बंधनकारक होते. परंतु आता पहिल्या ओव्हरमध्ये हा नियम लागू राहणार नाही. मात्र हा नियम फक्त पहिल्या ओव्हरपुरता मर्यादित ठेवण्यामागे महत्त्वाचे कारण आहे. सामन्याच्या सुरुवातीला चेंडू अगदी नवीन असतो. जर पुढील ओव्हरमध्ये, म्हणजे 8-10 ओव्हर जुना चेंडू परत न मिळाल्यास तसेच चेंडू मिळवणे कठीण होईल. त्यामुळे सामन्याच्या संतुलनावर परिणाम होऊ नये म्हणून हा नियम फक्त पहिल्या ओव्हरसाठीच लागू करण्यात आला आहे.
बिग बॅश लीगमध्ये कूकाबुर्रा कंपनीच्या पांढऱ्या चेंडूचा वापर केला जातो. या चेंडूची किंमत साधारण 20 हजार रुपये असते. त्यामुळे पहिल्या ओव्हरमध्ये जर एखाद्या फॅनच्या हातात बॉल आला, तर त्याला 20 हजार रुपयांची वस्तू कोणत्याही खर्चाशिवाय मिळणार आहे.
या नियमामुळे स्टेडियममधील पहिल्या ओव्हरमध्येच उत्साह अधिक वाढणार असून प्रेक्षकांची नजर आता केवळ सामना पाहण्यावरच नाही, तर बॉल पकडण्यावरही असेल.