ऑस्ट्रेलिया विरुद्धचा चौथ्या टी20 सामन्यात भारतीय फलंदाजांनी पुन्हा एकदा सुमार फलंदाजीचं दर्शन घडवलं. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी टीम इंडियासाठी ही धोक्याची घंटा असल्याचं बोललं जात आहे. भारताने चौथ्या टी20 सामन्यात 20 षटकात 8 गडी गमवून 167 धावा केल्या आणि विजयासाठी 168 धावांचं आव्हान दिलं. या सामन्यात अभिषेक शर्माची विकेट पडल्यानंतर शिवम दुबेला प्रमोशन देण्यात आलं होतं. शिवम दुबे फलंदाजीला आला तेव्हा संघाच्या 6.4 षटकात 1 गडी बाद 56 धावा होत्या. त्यामुळे त्याच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती. ऑस्ट्रेलियाकडून 11वं षटक टाकण्यासाठी झाम्पा आला होता. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर शिवम दुबेने उत्तुंग फटका मारला. हा प्रहार इतका मजबूत होता की चेंडू 106 मीटर लांब गेला. हा चेंडू थेट मैदानाच्या बाहेर जाताना पंच फक्त पाहात राहिले. त्यानंतर पंचांकडे नवा चेंडू मागवण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे काही काळ हा खेळ थांबवला आणि नवा चेंडू मैदानात आल्यानंतर पुन्हा खेळ सुरु झाला.
शिवम दुबेच्या या षटकारामुळे 25 हजार रुपयांचं नुकसान झालं आहे. कारण टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या चेंडूंची किंमत जवळपास 25 हजार रुपये आहे. शिवम दुबेला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याचं प्रमोशन मिळालं खरं पण काही खास करू शकला नाही. शिवम दुबेने 21 चेंडूत 28 धावा केल्या. पण गोलंदाजीत त्याने कमाल केली. 2 षटकात 20 धावा देत 2 गडी बाद केले.
भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 167 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान ऑस्ट्रेलिया सहज गाठेल असं वाटत होतं. पण ऑस्ट्रेलियन फलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी गुंडाळलं. विजयी धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 119 धावांवर आटोपला. भारताने हा सामना 48 धावांनी जिंकला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे. भारताकडे ही मालिका जिंकण्याची मोठी संधी आहे. भारताने शेवटचा सामना जिंकला तर मालिका खिशात घालेल. पण ऑस्ट्रेलियाला ही मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी काहीही करून शेवटचा सामना जिंकावाच लागणार आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे मालिकेचा निकाल चार सामन्यातच लागणार आहे.