अमेरिकेच्या टॅरिफ दबावामध्ये भारताला लागला सर्वात मोठा जॅकपॉट, आंतरराष्ट्रीय बाजारातून मोठी गूडन्यूज
Tv9 Marathi November 08, 2025 07:45 AM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला आहे, भारतानं रशियाकडून तेल खरेदी करू नये अशी त्यांची भूमिका आहे. रशिया भारत आणि चीनकडून मिळणाऱ्या पैशांचा वापर हा युक्रेनविरोधातील युद्धात करत असल्यामुळे रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धविराम होत नसल्याचा आरोप अमेरिकेनं केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भरतावर 50 टक्के तर चीनवर तब्बल 100 टक्के टॅरिफ लावला आहे, तसेच त्यांनी अनेकदा असा दावा देखील केला आहे, की आपण रशियाकडून करण्यात येणार्‍या तेलाची खरेदी कमी करू असं आश्वासन आपल्याला भारतानं दिलं आहे. मात्र अजूनही भारताची रशियाकडून तेलाची खरेदी सुरूच आहे. दरम्यान आता आंतरराष्ट्रीय बाजारातून भारतासाठी एक गुड न्यूज समोर आली आहे, यामुळे भारताचा मोठा फायदा होणार आहे.

सौदी अरेबीयाची तेल कंपनी असलेल्या अरामकोकडून डिसेंबरच्या डिलिव्हरीसाठी कच्च्या तेलाच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. याचा थेट फायदा आता भारताला होणार आहे. अमेरिकेकडून रशियन तेल कंपन्यांवर घालण्यात आलेल्या प्रतिबंधांमुळे कच्च्या तेलाच्या पुरवठा साखळीमध्ये सध्या अडथळा निर्माण होत आहे, या पार्श्वभूमीवर ही मोठी बातमी आहे. रशियाऐवजी कच्च्या तेलासाठी इतर देशांचा पर्याय शोधणाऱ्या देशांसाठी हा मोठा दिलासा आहे.

भारताला दिलासा

जगातील सर्वात मोठी तेल निर्यातदार कंपनी असलेल्या अरामकोने नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरमध्ये होणाऱ्या तेल निर्यातीच्या किंमतीमध्ये मोठी कपात केली आहे. अरामकोने आपल्या कच्च्या तेलाच्या दरामध्ये प्रती बॅरल 1.2 ते 1.4 डॉलरपर्यंत कपात केली आहे. याचा सरळ अर्थ असा होतो की, आशिया खंडातील जे कच्च्या तेलाचे मोठे आयातदार देश आहेत, त्यांना याचा मोठा फायदा होणार आहे, यामध्ये भारताचा देखील समावेश आहे. तसेच रशिया सोडला तर कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी दुसरा पर्याय कोणता? याचा शोध घेणाऱ्या भारताला आता हा एक नवीन आणि किफायतशीर पर्याय देखील सापडला आहे, त्यामुळे भारताचा सर्वात मोठा प्रश्न सुटला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.