ऋषभ पंत आणि दुखापत आता एक समीकरणच तयार झालं आहे. ऋषभ पंत मोठ्या अपघातातून सावरून मैदानात परतला. पण त्याचं आणि दुखापतीचं शुक्लकाष्ठ काही संपलेलं नाही. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात पायाचं बोट फ्रॅक्चर झालं होतं. त्यानंतर तीन महिने मैदानापासून दूर होता. आता दक्षिण अफ्रिका ए संघाविरूद्धच्या अनौपचारिक कसोटी मालिकेतून पदार्पण केलं. तसेच दक्षिण अफ्रिकेच्या कसोटी मालिकेत कर्णधार शुबमन गिलच्या नेतृत्वात त्याची निवड झाली. पण दक्षिण अफ्रिका ए विरूद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा वाईट बातमी समोर आली आहे. तिसऱ्या दिवशीचा खेळ सुरु झाला तेव्हा केएल राहुल लगेच बाद झाला आणि तंबूत परतला. त्यानंतर ऋषभ पंत मैदानात उतरला आणि आक्रमक फलंदाजीला सुरुवात केली. पण त्याची फंलदाजी फार काही चालली नाही. कारण तीन चेंडूवर तीन वेळा दुखापत झाली आणि तंबूत परतण्याशिवाय पर्याय उरला नाही. यावेळी पंत दुखापतीने कळवळत होता.
दक्षिण अफ्रिका ए संघाकडून वेगवान गोलंदाज त्शेपो मोरेकीच्या तीन चेंडूंवर तीन वेळा दुखापत झाल्याने पंतला कळवळला. पहिला चेंडू हेल्मेटवर लागला. त्यानंतर काही वळात त्शेपो मोरेकीचा एक चेंडू डाव्या हाताच्या कोपऱ्याला लागला. त्यानंतर पंतने खेळ सुरुच ठेवला. मात्र तिसऱ्या चेंडू लागला आणि पंतला मैदान सोडण्याशिवाय पर्याय उरला नाही.वेदना कायम राहिल्यामुळे पंतला दोन वैद्यकीय विश्रांतीनंतर रिटायर हर्ट करावे लागले. ऋषभ पंत 22 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकार मारून 17 धावा करत रिटायर हर्ट झाला.
ऋषभ पंतची दुखापत किती गंभीर आहे हे मात्र कळू शकलेलं नाही. पण क्रीडा चाहत्यांची चिंता मात्र वाढली आहे. कारण आता दुखापतीतून सावरून मैदानात परतला होता. पंतच्या दुखापतीबद्दल सध्या बीसीसीआयकडून अपडेटची वाट पाहिली जात आहे. ऋषभ पंतची दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात निवड केली आहे. पहिला कसोटी सामना 14 नोव्हेंबरपासून, तर दुसरा कसोटी सामना 22 नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. त्यामुळे पंतची दुखापत किती गंभीर आहे आणि कसोटी मालिकेसाठी तंदुरूस्त होईल का? याकडे लक्ष असणार आहे.