मनसेसोबत युती करणार का? शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले?
GH News November 08, 2025 07:11 PM

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र येण्याची शक्यता आहे. राज आणि उद्धव ठाकरे हे अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसल्याने युतीची अटकळ बांधली जात आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही. जर या दोन्ही पक्षांची युती झाली तर मनसे महायुतीत सामील होणार का असा प्रश्नही उपस्थित होते आहे. आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत भाष्य केले आहे.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अकोल्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना पार्थ पवार प्रकरण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. तसेच आगामी निवडणूकीत मनसेसोबत युती करणार का? याबाबतही शरद पवार यांनी विचारणा करण्यात आली. या सर्व प्रश्नांवर शरद पवारांनी भाष्य केले आहे.

मनसेसोबत युती करणार?

महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मनसेला सोबत घेणार का? या प्रश्नावर बोलताना शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला आहे. शरद पवार म्हणाले की, ‘आघाडीतील नेत्यांनी यासंदर्भात एकत्र बसून निर्णय घ्यायला हवा. काँग्रेसने लगेच टोकाची भूमिका घेऊ नये.’ दरम्यान मनसेला आघाडीत घेण्यात काँग्रेसचा विरोध आहे. त्यामुळे पवार यांनी एकत्र बसून चर्चा करून निर्णय घेण्याबाबत भाष्य केले आहे.

पार्थ पवारावरील आरोपांवर भाष्य

पार्थ पवार यांच्या कंपनीच्या जमीन व्यवहार प्रकरणावरही शरद पवार भाष्य केले आहे, त्यांनी या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी असं म्हटलं आहे. पार्थ पवार यांच्यावर गुन्हा का नोंदवला नाही? या प्रश्नावर बोलताना शरद पवार म्हणाले की, ‘पार्थवर गुन्हा का नोंद नाही? याबाबत गृहमंत्री फडणवीस योग्य माहिती सांगू शकतील अर्थातच ते बोलू शकतील. त्यांनी चौकशी करून वास्तव समोर आणावं.’

सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवार चुकीचे नसल्याचं मत मांडलं होतं. याबाबतच्या प्रश्नावर बोलताना शरद पवार म्हणाले की, ‘सुप्रिया सुळे यांचं ते मत वैयक्तिक आहे. पक्षाची अधिकृत भूमिका हीच आहे की या प्रकरणाची चौकशी होऊन वास्तव समोर यायला हवं. कुटुंब वेगळं आणि राजकारणं वेगळं आहे. आमच्या कुटुंबातही एकमेकांविरोधात निवडणुका लढल्या जातात. मात्र असं असलं तरीही कुटुंबाची विचारधारा एकच आहे असंही शरद पवार म्हणाले आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.